नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात नुकतीच तलाठी परीक्षा (Talathi Bharti 2023) झाली. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली आहे. नाशिकच्या एका परीक्षा केंद्राबाहेर संशयास्पद व्यक्ती आढळून आल्याने पोलिसांना (nashik police) धक्का बसला आहे. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, पोलिसांना त्याचा संशय आला आणि त्याला ताब्यात घेतले. स्पाय हेडफोन, वॉकीटॉकी, दोन मोबाईल, एक टॅब अशा काही वस्तू आढळून आल्या आहेत. गणेश शामसिंग गुसिंगे (ganesh shamsing gusinge) असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती परीक्षा केंद्राच्या बाहेरुन मदत करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील वेब इन्फोटेक सोल्युशन, प्रा. लि. या परीक्षा केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. तिथं एक व्यक्ती फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. तो काही प्रश्नांची उत्तर संशयास्पद देत असल्यामुळं त्याची पोलिसांनी झडती घेतली.
त्या संबंधित व्यक्तीकडे हायटेक साहित्य, कानात लावण्याचे स्पाय हेडफोन, वॉकी टॉकी, दोन मोबाईल, एक टॅब अशा वस्तू आढळून आल्या आहेत. गणेश शामसिंग गुसिंगे (रा. मु. संजारपुरवाडी, पोस्ट, परसोडा, ता. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद) असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या व्यक्तीकडील मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संगणकावरील प्रश्नांचे फोटो मिळून आले आहेत, त्यामुळे पोलिस त्या व्यक्तीच्या साथीदारांचा शोध घेत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण होती. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रात एकचं व्यक्ती होती, की आणखी किती व्यक्ती होत्या ? इतर परीक्षा केंद्रात ही व्यक्ती मदत करीत होती का ? या सगळ्या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.