मुंबई: पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमधून पसार झालेल्या चोराला पुन्हा जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासांत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या चोराला हुडकून काढले. या सगळ्या रंजक प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Robber fled away from quarantine centre in Mumbai)
काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी बोरिवली परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या होत्या. या चोराने बोरिवलीतील जवळपास डझनभर मेडिकल्समधून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केली होती. या चोराला पोलिसांनी जेरबंदही केले होते.
यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये हा चोर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे या चोराची रवानगी कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या साईनगरमध्ये असणाऱ्या क्वांरटाईन सेंटरमध्ये करण्यात आली होती. त्यावेळी मी येथून दोन दिवसांत पळून जाईन, असे खुले आव्हान चोराने पोलिसांना दिले होते.
त्याप्रमाणे हा चोर क्वारंटाईन सेंटरमधील खिडकीच्या जाळ्या कापून फरारही झाला होता. हा चोर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमधून पळाला होता. या चोराचे नाव करीम शाबुल्ला खान असून तो अवघ्या 24 वर्षांचा आहे. क्वारंटाईन सेंटरमधून पळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अवघ्या 24 तासांमध्ये ओशिवरा परिसरातून त्याला जेरबंद करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी गोरेगाव परिसरात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पकडला होता. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या मोतीलाल नगर परिसरात लिंक रोडनजीक एका हॉटेलच्या किचनमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स दडवून ठेवण्यात आली होती. ही इंजेक्शन्स 20 ते 25 हजार रुग्णांच्या नातेवाईकांना रुपयांना विकली जात होती.
इतर बातम्या:
पाच ते साडेपाच हजारात मिळणारं रेमडेसीवीर इंजेक्शन जालन्यात अवघ्या 1400 रुपयात मिळणार
मोठी बातमी: रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश
धक्कादायक! रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार रुपये चोरले
(Robber fled away from quarantine centre in Mumbai)