जयपूर : राजस्थानमधील जयपूर अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणातून एका जोडप्याला भयंकर शिक्षा दिल्याची घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली आहे. जोडप्याला चपलांचा हार घातला, त्यांच्या नाकाला गरम चिमट्याचे चटके दिले. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत यानंतर त्यांनी जोडप्याला लघवीही पाजली. या शिक्षेसोबतच 45 हजार रुपयांचा दंड ठोठावला. धक्कादायक म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
22 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. यानंतर पीडित जोडप्याने पोलीस ठाणे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा नव्याने तपास करत आहेत.
पीडित तरुणाचा 2006 मध्ये विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ होऊ लागल्याने 2015 पासून त्याच्याविरोधात खटला सुरु आहे. यादरम्यान त्याने दुसरा विवाहही केला.
मात्र विवाहानंतर काही दिवसांनी त्याचे पहिल्या पत्नीच्या वहिनाशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे त्याचे आधीचे सासरवाडीतले लोक नाराज होते. याचप्रकरणी त्यांनी तरुणाला 22 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या घरी बोलावले.
सासरवाडीत पोहचल्यानंतर तरुणासह पत्नीच्या वहिनीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलीस कारवाईची कुणकुण लागताच प्रेमी जोडप्याला माधोराजपुरा येथे नेले. तेथे समाजातील पंचांसोबत पंचायत झाली.
यानंतर पंचायतीच्या समोरच दोघांना लघवी पाजून गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. तसेच दोघांच्या नाकाल गरम चिमट्याचे चटकेही देण्यात आले.