लातूर : लातूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गेल्या 45 वर्षांपासून एकमेकांसोबत संसाराचं गाडं ओढणाऱ्या दाम्पत्याला एकत्रच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे परिसरात शोकाकूळ वातावरण आहे. मृतक दामपत्याचं सिद्रामप्पा आणि ललिता इटले असं नाव आहे. सिद्रामप्पा यांना आधी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच मानसिक धक्क्याने ललिता यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचंही निधन झालं.
संबंधित हृदयद्रावक घटना ही लातूर जिल्ह्यातील उस्तुरी येथे घडली आहे. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पती-पत्नीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलंगा तालुक्यातल्या उस्तुरी इथं सिद्रामप्पा आणि ललिता इटले हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. सिद्रामप्पा यांना काल (16 जुलै) सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुःखात बुडालेल्या पत्नी ललिता यांनादेखील काही वेळाने हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
सिद्रामप्पा आणि ललिता यांनी 45 वर्ष संसार केला. या दाम्पत्याला चार विवाहित मुले आणि नातवंडे, सुना असा परिवार आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं