रांची : प्रेमात पडण्याची खूप मोठी किंमत झारखडंमधील जोडप्याला (love) चुकवावी लागली आहे. एक विवाहीत तरूणी तिच्या प्रियकरासोबत आढळल्यानंतर (couple beaten by mob) संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत त्या तरूणीचा जीव गेला तर तो युवक गंभीर जखमी झाला आहे. अर्धमेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीचा जीव घेऊनही गावकऱ्यांना काहीच पश्चाताप नसून त्यांनी तातडीने पंचायतीची बैठक बोलावत मृत तरूणीच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये देऊन त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
३० जून रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा कोणालाच पत्ताही लागला नाही, मात्र आता सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सात लोकांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
नक्की काय झालं ?
ही घटना झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील मसुरियातारी गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मसुरियातरी गावात राहणाऱ्या सुगिया या तरुणीचे गावातीलच घोपीन गांझू या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 30 जूनच्या रात्री ते दोघं आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. हे पाहून संतप्त जमावाने त्यांना खांबाला बांधले आणि बेदम मारहाण केली. यामुळे सुगियाचा जागीच मृत्यू झाला, तर घोपीन हा बेशुद्ध पडला. गंभीर अवस्थेतील घोपीनला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुगियाचा मृत्यू झाल्याचे समजताच तातडीने ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्यात आली आणि या घटनेचा कुठेही उल्लेख करू नये अशी धमकी सुगियाच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांचे तोंड बंद करण्यासाठी पंचायतीने त्यांच्या खात्यात तीन लाख रुपयेही जमा केले, असे समजते. त्यानतंर सुगियाच्या मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्या रात्रीच हे प्रकरण दाबले गेले. मात्र दोन दिवसांनंतर अचानक या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये जमाव एका जोडप्याला खांबाला बांधून बेदम मारहाण करत असल्याचे दिसत होते.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुगियाचा मृत्यू झाल्याचे असून घोपीन हा तिचा प्रियकर गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर खुनाचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. घटनेची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी या सर्वांना अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
६ वर्षांपूर्वी सुगिया हिचे मसूरियातरी येथील फुलदेवशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी फुलदेव हा पैसे कमावण्यासाठी गावाबाहेर पडला. पत्नी व मुलीला त्याने गावातच ठेवले. त्यानंतर सुगिया व घोपीन यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दोघे बऱ्याच वेळा लपूनछपून भेटत असत. ३० जूनच्या रात्रीही दोघे एकत्र होते, तेवढ्यात गावातील काही लोकांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. संतापलेल्या जमावाने त्यांना गावातील आखाड्यात नेऊन खांबाला बांधले व बेदम मारहणा केली. यामुळे दोघेही बेशुद्ध झाले. दुर्दैवाने सुगियाचा त्यातच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.