पिंपरी | 14 सप्टेंबर 2023 : अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा गाजलेला ‘बंटी और बबली’ चित्रपट आठवतोय का ? त्यामध्ये ते दोघे मिळून देशभरात फिरायचे आणि लोकांना गंडा घालायचे. त्यांच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी विविध शहरात ऐशो-आरामात राहून, भरपूर पैसे लुटून लोकांना ठगवल्याचे (scam) चित्रपटात दाखवले आहे. पण अखेर पोलिस त्यांना जेरबंद करतातच आणि त्यांच्या लुटीच्या कारवाया थांबल्या. पण प्रत्यक्षातही असेच बंटी-बबली असल्याचे समोर आले असून पिंपरी – चिंचवडमधील (in pimpri) त्यांच्या कारवायांमुळे नागरिक जेरीस आले होते. अखेर पोलिसांनी त्या दुकलीला अटक केली आहे.
गणेश बोरसे व त्याची पत्नी हा कारमाना करत होते. या दोघांनीही अनेक लोकांना फसवल्याची माहिती समोर आली आहे. कापड दुकानाच्या मालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता या दोघांचे कारनामे उघड झाले. गणेश व त्याची पत्नी विविध दुकानांमध्ये जाऊन खरेदी करत असत. खरेदीनंतर यूपीआयद्वारे पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीनशॉट ते दाखवायचे आणि पोबारा करायचे.अशा प्रकारे त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी ४०० हून अधिक लोकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत त्यांनी फसवणूक केली. दुकान मालकाच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेत त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली.
मोबाईल करायचा बंद, नव्या सिमने नवा कारनामा
व्यायवसायिकांना फसवल्यानंतर गणेश हा त्याचा मोबाईल स्विच ऑफ करायचा. आणि पुढल्या वेळी गुन्हा करताना नवं सिम वापरायला काढायचा. गणेश व त्याची पत्नी, या आधुनिक बंटी-बबलीने आत्तापर्यंत शेकडो लोकांना फसवून माल गोळा केला. हे आरोपी आरोपी रहाटणी, वाकड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेत अटक केली. आत्तापर्यंत जवळपास ४०० हून अधिक जणांची त्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले.