नागपूर / सुनील ढगे : बाईक चोरुन नंबर प्लेट बदलून ओएलएक्सवर विकणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून चोरीच्या 12 बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असून, पोलीस त्यांच्याही शोध घेत आहेत. शौक पूर्ण करण्यासाठी आरोपी बाईक चोरी करायचे. आरोपींनी आतापर्यंत किती ठिकाणी किती बाईक चोरल्या, याबाबत पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.
नागपूर शहरामध्ये बाईक चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना वाढल्या आहेत. यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी आपलं लक्ष याकडे केंद्रित केलं आहे. बाईक चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस बाईक चोरी झालेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पोलिसांना एक चोरटा बाईक उचलताना सीसीटीव्हीत दिसला.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेत त्याला अटक केली. चोरट्याची चौकशी केली असता त्याच्या दुसऱ्या साथीदाराची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या. आरोपींची चौकशी केली असता, एक बाईक चोरायचा आणि दुसरा नंबरप्लेट बदलायचा. मग बदललेला नंबर आरटीओच्या कागदपत्रात टाकून त्या बाईक ओएलएक्सवर विकायचा, असे आरोपींनी सांगितले.
आपले शौक पूर्ण करण्यासाठी आरोपी बाईक चोरी करायचे आणि विकून पैसे मिळवायचे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून वेगवेगळ्या परिसरातून चोरलेल्या 12 बाईक हस्तगत करण्यात यश मिळवलं. या दोघांच्या व्यतिरिक्त यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, त्या दोघांचा शोध गुन्हे शाखा पोलीस घेत आहेत.