कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. ड्रग्सच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ६ कडे असणाऱ्या एका प्रकरणात आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे बरीच खळबळ माजली आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी , ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. डोंगरी, मुलुंड आणि कुर्ला या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. त्याच आरोपींपैकी चौघा जणांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
फार्महाऊस, फ्लॅट, कार आणि बरंच काही..
अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली आहे. या मालमत्तेत नाशिकच्या मालेगावमधील एक फार्महाऊस, शिळफाटा येथील एक फ्लॅट, एक रो हाऊस , मुंब्रा येथील एक फ्लॅट, तसेच शिळफाट्याजवळ चाळीतील एक घर, सोन्या-चांदीचे लाखोंचे दागिने आणि रोख रकमेचाही समावेश आहे. तसेच यामध्ये एक क्रेटा कारही जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करून कमावलेल्या पैशातून ही स्थावर आणि जंगम मालमत्ता जमवण्यात आली होती. तीच आता जप्त करण्यात आली आहे. एकूण ३ कोटी रुपयांची मालमत्ता अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
११ आरोपींना अटक
ऑगस्ट महिन्यात गुन्हे शाखेने अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. अधिकाऱ्यांनी एकूण १२ जणांना अटक करत त्यांच्याकडून एम.डी आणि चरस हे कोट्यवधींचे अमली पदार्थही जप्त केले होते.
साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (२७) मोहमद अजमल कासम शेख (४५) शमसुद्दीन नियाजउद्दीन शहा (२२) इमरान अस्लम पठाण (३७), मोहमद तौसिफ शौकत अली मन्सुरी (२७),मोहमद इस्माईल सलिम सिध्दीकी (२४), सर्फराज शाबीरअली खान उर्फ गोल्डन (३६), रईस अमीन कुरेशी (38), सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकौर (२४), काएनात साहिल खान ( २८), सईद सज्जद शेख आणि अली जवाद जाफर मिर्झा यांना अटक केली. त्यांच्याजवळून ७१ लाख रुपयांचा एमडी आणि कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले होते, तसेच एक बाईकही ताब्यात घेतली होती.
त्याच आरोपींपैकी साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (२७), काएनात साहिल खान (२८), सर्फराज शाबीर अली खान उर्फ गोल्डन (३६) आणि सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकौर (२४) या चौघांच्या नावे असलेली सुमारे तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.