बेळगाव| 13 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक फोटोजवरून उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाही आता बेळगाव मधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याने त्याच्या मैत्रीणीचा डीपफेक फोटो मॉर्फ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मंथन (22) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंथनच्या मैत्रीणीने त्याच प्रपोजल नाकारलं. त्यामुळे तो प्रचंड रागावला होता. त्यामुळे चिडलेल्या मंथनने त्याच्या मैत्रीणीच्या फोटोंचा गैरवापर केला. त्याने डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून मैत्रीणीच्या फोटोंशी छेडछाड केली आणि ते फोटो न्यूड फोटोजसोबत जोडले.
मैत्रिणींचे फोटोही केले एडिट
या एडिट केलेल्या फोटोंच्या आधारे त्याने त्याच्या मैत्रिणीला धमकावले. पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही आणि त्याला थेट नकार दिला. त्यानंतर आरोपीने त्या तरूणीच्या मैत्रिणींचे फोटोही एडिट केले आणइ तेही सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर पीडित मुलींनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपी मंथन हा बेंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करतो.
डीपफेक म्हणजे काय ?
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ पाहून कोणालाही पटणार नाही की तो व्हिडिओ खोटा आहे. त्यानतंर अभिनेत्री कतरिना कैफ आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा हिचेही डीपफेक फोटो व्हायरल झाले होते. मात्र या प्रकारामुळे
अनेकजण चिंतेत आहेत. आपल्यासोबतही असे कोणीही करून नये, याचीच अनेकांना काळजी असते. हे डीपफेक नक्की आहे काय, ते जाणून घेऊया.
आजकाल, तंत्रज्ञान आणि एआयच्या मदतीने, कोणतेही चित्र, व्हिडिओ आणि ऑडिओ याच्याशी छेडछाड करून तो पूर्णपणे वेगळा बनवता येऊ शकतो. उदा. एखाद्या नेत्याचे, अभिनेत्याचे किंवा सेलिब्रिटीचे भाषण हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड टूलद्वारे पूर्णपणे बदलता येऊ शकते. पण हा व्हिडीओ किंवा फोटो पाहणाऱ्यालाा ते बदलण्यात आल्याचे कळतही नाही. याला डीपफेक म्हणतात.