नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : कानून के हाथ बहुत लंबे होते है… एका चोराला पकडण्यासाठी गुजरात पोलिसांनी जी मेहनत केली, कसून प्रयत्न केले. त्यांना ही म्हण अक्षरश: लागू होते. त्या चोराला पकडण्यासाठी थेट दिल्ली गाठून, विविध वेष बदलून अखेर पोलिसांनी त्याला अटक केलीच. कधी ते फुगेवाला बनले, तर कधी खेळणीही विकली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्या चोरट्याला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आला. हा चोर सुरूतमधून समारे 11.36 लाख रुपयांची चोरी करून फरार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील अल्ठन कॅनॉल रोडवरील ठाकोर पार्क सोसायटीत जगदीशभाई सुखाभाई अहिर हे पत्नी आणि 2 मुलांसह राहतात. जगदीश भाई हे कंत्राटदार आहेत. 28 जुलै रोजी ते त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले असताना चोरट्याने त्यांच्या घराची लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील कपाटातून 183 ग्रॅम सोने आणि 5.50 लाखांची रोकड चोरट्याने चोरून नेली.
११ लाखांचा माल चोरून झाले फरार
जगदीश भाई यांच्या घरातून चोरट्याने सुमारे 11.36 लाख रुपये चोरले आणि तो फरार झाला. सकाळी उठल्यावर सगळ्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार केले. खटोदरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर के धुलिया हे तपास करत असताना त्यांना 6 चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही टोळी फुगे व खेळणी विकण्याचा बहाण्याने सोसायट्यांमधील घरे निवडून रात्रीच्या वेळी तेथे चोऱ्या करत असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.
दिल्लीत होती चोरांची टोळी
चोरट्यांची ही टोळी सध्या दिल्लीत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर सूरत पोलिसांनी एएसआय योगेश साहेबराव, रामशी रत्नभाई, कविता मनुभाई, ब्रिजराज सिंग, जगदीश सिंग यांना दिल्लीला पाठवले. दिल्लीतील खजुरी परिसरात या टोळीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. मात्र या भागात फुगे आणि खेळणी विकणारे मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशा स्थितीत खरा चोर कोण, त्याची ओळख कशी पटवायची असा यक्षप्रश्न पोलिसांच्या समोर होते.
पोलिसच बनले फुगेवाले
अखेर त्या चोरांना शोधण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी स्वत:च फुगेवाल्याचा वेष धारण केला. आणि त्याच वेषात ते कितीतरी काळ फुगे आणि खेळणी विकत आसपासच्या लोकांवर, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यानी खोटी जत्राही निर्माण केली. त्या जत्रेमध्येच अखेर पोलिसांना लाखो रुपये लुटणाऱ्या त्या चोरट्याचा शोध लागला आणि त्याला अटक करण्यातही यश मिळाले. अभय उर्फ अक्षय मोहन सोळंकी असे चोराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.