माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना जळगावच्या जामनेर मध्ये घडली आणि खळबळ माजली. ही दुर्दैवी घटना अद्याप ताजी असतानाच आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून बापाचा खून करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. बाजीराव राजाराम पवार असे मयत पित्याचे नाव आहे. तर सुमित बाजीराव पवार (वय 32) असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. मृत बाजीराव पवार आणि त्यांचा मुलगा सुमीत यांच्यात दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून जोराचा वाद झाला. भांडणादरम्यान राग अनावर झाल्याने मुलगा सुमीत याने त्याच्या वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. हत्या केल्यानंतर मुलाला उपरती झाली, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. त्याने रक्तबंबाळ अवस्थेतील पित्याला रुग्णालयात दाखल केले, पण त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा सुमीत याने पोलिसांसमोर शरण जात वडिलांच्या खुनाची कबुली दिली.
नेमकं झालं तरी काय ?
गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास बाजीराव पवार आणि त्यांचा मुलगा सुमित बाजीराव पवार यांचा दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन मुलाने धारदार शस्त्राने पित्यावर सपासप वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने आणण्यात आला. तेव्हा मारेकरी मुलगा देखील सोबत होता. घटना ऐकून त्यावेळी डॉक्टरांसह कर्मचारी देखील चक्रावून गेले. त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात येऊन संशयित आरोपी सुमित पवार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान या थरारक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.