गाझियाबाद | 14 नोव्हेंबर 2023 : दिवाळी म्हटलं की आतिषबाजी आणि फटाके हे आलेच. वाढत्या प्रदूषणामुळे सरकारतर्फे फटाके न फोडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र तरीही लोक थोड्याफार प्रमाणात का होईना फटाके फोडतातच. अशाच रितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येत होते. मात्र तेच एक इसमाला भलतंच महागात पडलं.
खरंतर फटाका फोडणारी बंदूक फायर करणं त्याच्या जीवावरच बेतलं. कारण बंदुकीतून निघालेला तो फटाका एका इसमाच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊन लागला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. बघता-बघता परिसरात तणाव निर्माण झाला. सध्या पोलिस याप्रकरणी कारवाई करत आहेत.
फटाक्याच्या बंदुकीने केलं फायरिंग
खरंतर हे प्रकरण लिंक रोड भागातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवाळीच्या रात्री
झंडापुर भागात प्रदीप नावाच्या इसमाने अफजल उर्फ नाटू (वय 40) याच्यावर फटाके फोडण्याच्या बंदूकीने फायर केले, मात्र तो फटाका अफजलच्या प्रायव्हेट पार्टवर लागला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अफजलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने तेथे त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार
यानंतर आरोपी प्रदीप फरार झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. याप्रकरणी त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार आरोपी प्रदीप आणि पीडित अफजल हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंधित असल्याने संवेदनशीलता लक्षात घेऊन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.