कोल्हार | 16 ऑक्टोबर 2023 : समाजात गुन्ह्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. चोरी, दरोडा, खून, हल्ला, सायबर फ्रॉड अशा विविध गुन्ह्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होत असतो. या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी सदैव तत्पर असता. गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी ते प्रयत्न करतात. पण एखाद्या वेळेस कायद्याचे आणि लोकांचे हेच रक्षक भक्षक बनले तर ?
कायद्याच्या रक्षकानेच सामान्य नागरिकांना त्रास दिल्याची एक घटना उघडकीस आली. ठाणे जिल्ह्यात दोघांवर गोळीबार (firing) करून फरार झालेल्या हवालदाराला (police arrested) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोल्हार येथे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी, सूरज ढोकरे हा बसमधून पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, तसेच त्याच्याकडून एक पिस्तुलही हस्तगत केलं. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई करत आरोपीला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलं.
काय घडलं तिथे ?
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी पोलिस हवालदार सूरज ढोकरे हा मुंबईतील कलिना येथे कार्यरत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मैदे गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी ढोकरे याने दोघांवर सरकारी पिस्तुलीमधून गोळीबार केला. अजिम सय्यद आणि फिरोज शेख हे दोघेही या घटनेत जखमी झाले.
आरोपीने आठ राऊंड फायर करत गोळीबार केला. अजिम सय्यद याच्यावर सहा तर फिरोज शेखवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. या घटनेनंतर पडघा पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सुरज ढोकरे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. फायरिंगच्या घटनेनंतर फारा झालेला आरोपी सूरज कधी ट्रेन तर कधी बसमधून पळत वेगवेगळ्या ठिकाणी पसार होत होता.
अखेर तो बसमधून पळून जात असल्याची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला कोल्हार येथे जेरबंद केलं. त्याची बस कोल्हार स्थानकात येताच पोलिसांनी चलाखीने त्याला बेड्या ठोकल्या. त्यावेळी बस स्थानकात मोठी गर्जी जमली होती. त्यानंतर लोणी पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांकडे आरोपी सूरजला सुपूर्द केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली असून, त्याच्या जबाबानंतरच या गोळीबारामागचे कारण स्पष्ट होऊ शकेल.