नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या (Mobile theft) घटनांमध्ये अधिक वाढ होत असल्यामुळे पोलिसांनी एक पथक तयार केलं. त्या पथकाने मोबाईल चोरणारी कॉलेजमधील टोळी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाईल सुध्दा ताब्यात घेतले आहेत. पोलिस त्या विद्यार्थ्यांची (college student) कसून चौकशी करीत असून त्यामध्ये आणखी विद्यार्थी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांकडून 4 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मौज मजेसाठी मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे 22 मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे हे संशयित महाविद्यालयात शिक्षण देखील घेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोबाईल खेचून जबरी लूटीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना लक्षात घेता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सिडको येथील शांती नगर भागात राहणार संशयित चेतन निंबा पवार, पौर्णिमा बस स्टॉप परिसरात राहणारा संशयित शशिकांत सुरेश अंभोरे, जुने सिडको परिसरात राहणारा विजय सुरेश श्रीवास्तव या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
त्यावेळी चौकशीत विद्यार्थ्यांनी शहर परिसरातून चोरलेले एकूण 22 मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 53 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आडगाव 2, सातपूर 2, मुंबई नाका 1 आणि सरकारवाडा पोलीस ठाणे 1 अश्या 6 गुन्ह्यांची कबूली विद्यार्थ्यांनी दिली आहे. मौजमजा करण्यासाठी हे संशयित मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांनी सांगितले.