ठाणे : मगरीच्या पिलांची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंब्रा इथून अटक केली आहे. सकलेन सिराजुद्दीन खातीब असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मुंब्रा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मीळ प्रजातीचे मगरीच्या 7 पिलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (smuggling of rare species of crocodiles, Accused arrested)
मगरीच्या पिलांची विक्री करण्यासाठी एकजण मुंब्रा इथं येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 10 जुलै रोजी रात्री 11.35 वाजता मुंब्रा बायपास इथं रेतीबंदर पुलाखाली सापळा लावला. त्यावेळी एक व्यक्ती प्लॅस्टिक बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढलून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळील प्लॅस्टिक बॅगेत मगरीची तब्बल 7 जिवंत पिल्लं आढळून आली.
मगरीच्या पिलांना ठेवण्यासाठी तस्कराने एक खास पिंजरा असलेली प्लॅस्टिक बॅग बनवली होती. ही सर्व पिल्लं क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मीळ जातीची असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी पिल्लांची सुटका करत त्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ही पिल्लं प्रत्येकी 40 हजार रुपये दराने विक्रीसाठी आणली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या दुर्मीळ प्रजातीच्या मगरीच्या पिल्लांची एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केलं असता, त्याला 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने मगरीची ही पिल्लं कुठून आणली? तसंच या पिलांची विक्री तो कुणाला करणार होता? याचा तपास ठाणे पोलिसांचं खंडणी विरोधी पथक करत आहे.
VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 July 2021https://t.co/PVeiznVvFl | #PankajaMunde | #PritamMunde | #BharatiyaJanataParty | #Maharashtra | #Mumbai |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2021
इतर बातम्या :
घरावर पेट्रोल टाकून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, उल्हासनगर हादरलं
smuggling of rare species of crocodiles, Accused arrested