ठाणे / 29 ऑगस्ट 2023 : ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिलेबीचे पैसे मागितल्याने ग्राहकाने जिलेबी मालकाच्या डोक्यात लोखंडी माप मारल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी जिलेबी मालकाचा तोल जाऊन तो उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात विक्रेता गंभीर भाजला असून, त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. राजेश यादव असे पीडित जिलेबी विक्रेत्याचं नाव आहे.
वागळे इस्टेट परिसरात पीडित राजेश यादव यांचा जिलेबीचा गाडा आहे. या गाड्यावर आरोपी जिलेबी खाण्यासाठी आला होता. जिलेबी खाऊन झाल्यानंतर यादव यांनी आरोपीकडे पैसे मागितले. मात्र पैसे मागताच आरोपीला संताप अनावर झाला आणि शिवीगाळ करत निघून गेला. त्यानंतर काही वेळाने आरोपी भाजी विक्रेत्याचा वजन माप घेऊन आला. ते लोखंडी माप आरोपीने यादव यांच्या डोक्यात मारले. यावेळी डोक्याला इजा झाल्याने यादव यांचा तोल गेला आणि ते जिलेबी तळायच्या कढईत उकळत्या तेलात पडले. यात यादव गंभीर भाजले आहेत.
यादव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून तेथेच स्विट्सचे दुकान चालवणारा त्यांचा भाऊ धावत आला. त्याने जखमी राजेशला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. नंतर ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक नाही.
जिलेबीचे पैसे मागितल्याने एकाने जिलेबी विक्रेत्याच्या डोक्यावर लोखंडी वजन माप मारल्याने विक्रेता तोल जाऊन हातगाडीवरील उकळत्या तेलाच्या कडईवर पडला. त्यामुळे हा विक्रेता गंभीर जखमी झाला असून हा प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये घडला. आरोपीविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेला तीन दिवस होऊनही आरोपीला अटक झाली नाही.