पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Pune International Airport) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना अडवले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये 466 जीवंत प्रवाळ (corals) आढळून आले . ताब्यात घेतलेले प्रवासी ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बॅगची कसून झडती घेतल्यावर, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची I आणि CITES च्या परिशिष्ट II अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिवंत प्रवाळांचे 466 नमुने सापडले. ते व्यावसायिक कारणांसाठी घेतल्याचे प्रवाशांनी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 466 जीवंत प्रवाळ ताब्यात घेतले असून त्यांना मुंबई (Mumbai) येथे पुनर्वसनासाठी पाठवले आहे.
कोरल सामान्य पाण्यात जगू शकत नाहीत, त्यांना क्षारयुक्त पाण्याची आवश्यकता असते. त्यांना जगण्यासाठी नैसर्गिक अधिवासाची आवश्यकता असते. दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींनी प्रावळ पिशवीत आणले होते. किमान 100 प्रवाळ काचेच्या भांड्यात होते तर 366 प्लॅस्टिकच्या पिशवीत होते. कोरल ते मत्स्यालयात ठेवायचे होते आणि नंतर प्रवाशांना ते व्यावसायिक व्यवसायासाठी वापरायचे होते अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी दिली आहे.
कोरल आत्तापर्यंत कितीवेळा भारतात आणले आहे. त्याचा उपयोग काय केला आहे. किती वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे अशा अनेक गोष्टीची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच दोघांच्याकडून अनेक गोष्टी उघड होतील असं सुध्दा सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.