वसई : गेल्या काही काळात एटीएम फ्रॉडच्या (ATM fraud) घटना वाढल्यात. त्या पार्श्वभूमीवर वसईतील (Vasai) माणिकपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. तुमच्या एटीएमचा डाटा चोरुन, आर्थिक फसवणूक होण्याची भीती आहे. तुम्ही वापरत असलेल्या एटीएममध्ये स्कीमर मशिन लावलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्कीमर मशिनच्या मदतीनं ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डाटा चोरला जात होता. त्यानंतर बनावट एटीएम तयार केलं जात होतं. आणि कार्ड तुमच्याकडे असतानाही स्वाईप करुन भलताच कुणीतरी माणूस पैसे काढून पसार होत असल्याचे प्रकार वाढले होते. या सगळ्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चौघांना एटीएम फ्रॉडप्रकरणी अटक (Police Arrest) करण्यात आली असून 4.14 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. दरम्यान, एटीएम स्कीमर मशीन नेमकी असते काय, असा प्रश्नही आता ग्राहकांना पडलाय. तसंच एटीएम मशिन वापरताना नेमकी काळजी ग्राहकांनी काय घ्यायला हवी, यावरुनही संभ्रम ग्राहकांच्या मनात निर्माण झालाय.
डेबिट कार्डचा डाटा स्कॅन करून ग्राहकांचे बँक अकाऊंटमधील मधील पैसे लुटणारी आंतरराज्य टोळी सक्रिय होती. सौरभ उज्वलकुमार यादव, धनराज केशो पासवान, पवनकुमार अखिलेश पासवान, राकेश कारू चौधरी असे या टोळीतील अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नाव आहेत. हे सर्वजण बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. या टोळीतील सौरभ यादव हा मुख्य मास्टर माईंड आहे. हे सर्वजण संगनमत करून स्कीमर मशीन एटीएम मध्ये बसवायचे. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आलेल्या ग्राहकांच्या एटीएमचा सर्व डाटा स्कॅन करून घ्यायचे.
त्यानंतर ते स्कीमर लॅपटॉपला लावून, सॉफ्टवेअरचा वापर करून , डेबिट कार्डचा डाटा दुसऱ्या बनावट बँक खात्यात टाकायचे. एटीएममधून पैसे काढून ग्राहकांना लुटणाऱ्या या टोळींचा सुळसुळाट सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. अनेकांचे बँक अकाऊंट या टोळ्यांनी खाली केले आहेत. मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे आर्थिक फसवणूक होतेय. अशा प्रकारच्या घटना वसई विरारसह मुंबई, ठाणे, पालघर परिसरात वाढल्यात. त्यामुळे पोलिसांनी यावर पाळत ठेवली होती.
एटीएममध्ये स्कीमर मशीन बसविण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती, माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सचिन सानप आणि त्यांच्या टीमला मिळाली होती. त्यांनी सापळा रचून सौरभ या मास्टरमाईंड आरोपीला पहिल्यांदा ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे एक स्कीमर मशीन मिळाली. नंतर त्याच्या विरार येथील घरात झडती घेतली. या पोलिसांना 3 लॅपटॉप, 4 एटीएम कार्ड क्लोनर, 08 एटीएम स्कीमर मशीन, 05 मोबाईल, विविध बँकेचे 103 एटीएम कार्ड, 2 नोटबुक ज्यावर ओटीपी आणि पिन नंबर लिलेले होते, 1 मोटारसायकल असा 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल सापडला आहे.
त्यानंतर यांच्या सर्व टोळीचा तपास लावून आणखी बिहार राज्यातील अन्य 3 जणांना अटक केली. या चारही सराईत गुन्हेगारांवर वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471, 34 कलम 66 (क) 66(ड), माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आलाय. 30 एप्रिल रोजी पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटक केले आहे. पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
हे सराईत गुन्हेगार एटीएममध्ये कोणी नसल्याचे पाहून अवघ्या दीड ते 2 मिनिटात स्कीमर मशीनमध्ये बसवत होते. त्यानंतर एटीएम मशीनच्या बाजूला किंवा, एटीएमच्या बाहेर उभे राहायचे. जर कुणाला एटीएम मध्ये पैसे काढताना अडचण झाली तर त्यांना पैसे काढून देण्याच्या नावाखाली एटीएमची ही अदलाबदल करायचे. अन्यथा स्कीमर मशीनने तर ग्राहकांच्या एटीएमचा पूर्ण डाटा स्कॅन होतंच होता. त्यानंतर स्कीमर मशीन लॅपटॉप ला लावून ते दुसऱ्या बनावट एटीएमवर तो स्कॅन डाटा करून, पिन आणि ओटीपीच्या आधारे ग्राहकांच्या एटीएममधून पैसे काढून फरार होत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या स्कीमर मशीन च्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे एटीएम मधून लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले एटीएम कार्ड कुणाच्या हातात देऊ नये. आपला पिन किंवा ओटीपी नंबर कुणाला सांगू नये. अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते, असेही आवाहन पोलिसांनी केलंय.