इचलकरंजी : शेअर मार्केटमधून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी 40 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच कोल्हापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह कंपनी मालक आणि भागीदारावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश नथू पटेल (वय 49 वर्ष, राहणार जिव्हाजी भवनसमोर, कोल्हापूर रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. काव्या त्रिपाठी, रचना तिवारी, गॅलेक्सी कंपनीचे मालक संजय पटेल आणि त्यांचे भागीदार यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी सायबर पोलिस ठाणे कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. इचलकरंजी शहरात अशाप्रकारे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार रमेश पटेल हे हार्डवेअर व्यापारी आहेत. ते एंजल ब्रोकिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार आहेत. याच माध्यमातून काव्या त्रिपाठी नामक महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण गॅलेक्सी ॲपेक्स फॉरेन ट्रेड मार्केटिंग ब्रोकर कंपनीतून बोलत असल्याचे तिने सांगितले. आमच्या कंपनीमार्फत अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळतो, असे आमिष तिने पटेल यांना दाखवले.
आधी 50 हजार रुपयांची गुंतवणूक
या संदर्भातील माहिती देताना तिने कंपनीतील डायमंड प्लांट देण्यास भाग पाडले. त्यामध्ये गुंतवणुकीवर दिवसागणिक सात ते 25 टक्क्यांपर्यंत फायदा मिळेल, असे सांगण्यात आले. रमेश पटेल यांनी विश्वास ठेवून पत्नी जशोदाबेन यांच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या ट्रिनिटी इंटरप्राईजेस या कंपनीच्या बँक खात्यावर भरले. त्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर मिळणारा फायदा मिळण्यासाठी संशयितांनी एक लिंक दिली. त्या लिंकद्वारे कंपनीचे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले.
नंतर एक कोटी तीस लाख भरले
पटेल यांनी ॲप डाऊनलोड केल्यानंतर गुंतवणूक परतावा हा डॉलरमध्ये दिसू लागला. त्यानंतर कंपनीकडून पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. जास्त गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळत असल्याचे आमिष त्यांना पुन्हा दाखवण्यात आले. त्यामुळे आपल्या पत्नीच्या बँक खात्यातील एक कोटी 29 लाख रुपये त्यांनी या कंपनीत गुंतवले. त्यानंतर वरील फायदा परत देण्याची मागणी केली, त्यावेळी संशयित पटेल आणि तिवारी यांनी पुन्हा आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे आपली एक कोटी 40 लाख 51 हजार 873 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
हा आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने आणि फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा कोल्हापुरातील सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार
गेल्याच वर्षी शासकिय सेवेत रुजू, 40 हजारांची लाच घेताना तरुण अधिकारी उस्मानाबादमध्ये अटक
(Kolhapur Ichalkaranji Cyber Crime Businessman duped for 1.4 crore luring to invest in American share market)