हातात बंदूक घेऊन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये व्हिडीओ, कोल्हापुरात तिघांना अटक

| Updated on: Jul 19, 2021 | 3:25 PM

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये हातात चाकू, तलवार यासह अन्य घातक शस्त्रं घेऊन चित्रपटातील डायलॉग मारत दहशत माजवण्याचा प्रकार इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडू लागला आहे.

हातात बंदूक घेऊन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये व्हिडीओ, कोल्हापुरात तिघांना अटक
व्हॉट्सअॅप स्टेटसमधील व्हिडीओतून दहशत पसरवण्याचा प्रयत्न
Follow us on

इचलकरंजी : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये हातात बंदूक घेतलेला व्हिडीओ शेअर करुन दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सोमवारी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने शहरात वादग्रस्त स्टेटस ठेवून दहशत माजवण्याचा प्रकार पुन्हा होत असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये हातात चाकू, तलवार यासह अन्य घातक शस्त्रं घेऊन चित्रपटातील डायलॉग मारत दहशत माजवण्याचा प्रकार इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडू लागला आहे. सोमवारी सकाळी कबनूर गावातील मोहसीन फकीर याने आपल्या दोघा मित्रांसोबत हातात बंदूक घेत, डायलॉग मारत त्याचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. तोच व्हिडीओ आपल्या मोबाईलवरील स्टेटसमध्ये ठेवून व्हायरल करत त्यातून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओतील तिघांनाही अटक

हा प्रकार समजताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी मोहसीन फकीर, अभिजीत तावरे, हैदर मुजावर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने वादग्रस्त स्टेटस ठेवून दहशत माजवण्याचा प्रकार होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काहीजणांकडून इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडियावर घातक शस्त्रे तसेच चिथावणीखोर आव्हानात्मक मजकुराचा स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षीही पोलिसांनी अशा तरुणांच्या मुसक्या आवळल्या होत्या

पिंपरीत यम भाईची वरात

याआधी, कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरात काढली होती. आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली. यम भाईने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं तो व्हिडीओत म्हणाला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या :

‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादळाची तयारी’, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली 

VIDEO : पिंपरी चिंचवड पोलिसांचा कोयता भाईला दणका, जिथे कोयता मिरवला त्याच परिसरातून वरात

(Kolhapur Ichalkaranji police arrests three who keep whatsapp status video with guns and weapons)