नागपूर : झटपट पैसे कमविण्यासाठी देशभरात अनेक सायबर टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या दररोज अनेकांना गंडा घालताहेत. मात्र, या सायबर गुन्हेगारांनी आता वृद्धांना टार्गेट करणं सुरु केलं आहे. अश्लील कॉल करुन वृद्धांना ब्लॅकमेल केलं जातंय. अनेक वृद्ध नागरिक अशा कॉलला बळी पडताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सेक्सस्टोर्शनचे प्रमाण वाढत चालले आहेत. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यात तरुणींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सोशल मीडिया किंवा थेट फोन करुन या टोळ्या वृद्धांना टार्गेट करत आहेत.
वृद्धांच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवला जातो. त्यांना फोन करुन अश्लील संवाद साधला जातो. त्यानंतर लगेच फोन करुन क्राईम ब्रांच किंवा सायबर सेल मधून बोलत असल्याचं सांगत खंडणी म्हणून मोठी रक्कम मागितली जाते. नागपुरातील अनेक वृद्ध या प्रकाराला बळी पडताहेत. काही वृद्ध असे प्रकार लगेच ओळखून घेतात. तर काही वृद्धांना धोका लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक होते.
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांचं धाडस वाढत चाललं आहे. अनेकदा प्रकार लक्षात येत नसल्याने फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यावर सायबर सेलने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीही फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.
ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फ्रॉड करणाऱ्या भामट्यांना जेरबंद करणं पोलिसांपुढेही मोठं आव्हान असतं. पण काही दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांनी मोठी कामगिरी केली होती. राजस्थानच्या भरतपूर येथून सर्वसामान्यांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं होतं. या रॅकेटने देशातील तब्बल 15 राज्यातील नागरिकांना ऑनलाईन लुबाडलं होतं. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी 100 पेक्षा जास्त भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे भामटे लोकांशी ऑनलाईन चॅट करायचे. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करुन फसवायचे.
विशेष म्हणजे या गँगमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वचजण अशिक्षित आहेत. तरीदेखील ते लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन दर महिन्याला 10 ते 20 लाख रुपये कमवतात. हे भामटे मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवायचे. त्यानंतर त्यांच्याशी सेक्शुअल चॅट करायचे. नंतर भावनांमध्ये गुंतवून अश्लील व्हिडीओ कॉलही करायचे. त्यानंतर पैशांसाठी ब्लॅकमेलिंग करायचे.
हेही वाचा : मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा