पुणे / अभिजीत पोते : पुण्यातील औंध परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळजनक माजली आहे. औंध परिसरात एका इमारतीत तीन जणांचे मृतदेह आढळून आले. नवरा बायको आणि मुलगा अशा तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही हत्या आणि आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि 8 वर्षीय मुलाची पॉलिथिन बॅगने गळा दाबून हत्या केली. त्यांनर स्वतः गळफास घेतला असल्याची माहिती सामोर येत आहे. हे जोडपे मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून पुण्यात एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता. सुदिप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्या 44 वर्षीय इंजिनिअरचे नाव आहे. त्याने 40 वर्षीय पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली आणि 8 वर्षाच्या मुलाचा हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
‘अशी’ उघड झाली घटना
गांगुली याचा बंगलोर येथे राहणारा भाऊ मंगळवारी रात्री त्याला फोन करत होता. मात्र तो फोन उचलत नव्हता. बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला. बुधवारी दुपारी पोलिसांनी सुदिप्तो गांगुली याचे औंध परिसरातील घर गाठले. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता 3 मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सुदिप्तोने कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून नोकरी करत होता.