अहमदनगर : पोल्ट्रीफार्मवर काम करणाऱ्या कामगाराचे पत्नीसोबत रात्री भांडण झाले. यानंतर आजूबाजूच्य लोकांनी मध्यस्थी करत दोघांचे भांडण मिटवले. यानंतर रात्री कुटुंबीय झोपी गेले. सकाळी पोल्ट्रीफार्मवरील दुसरा कामगार विहिरीवर मोटार लावायला गेला. मात्र समोरील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. विहिरीत आई आणि तीन मुलांचे मृतदेह तरंगत होते. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पाथर्डी पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे.
माळी बाभुळगाव येथे दिपक गोळक यांच्या मालकीचे पोल्ट्रीफार्म आहे. या पोल्टीफार्मवर काम करणारी पाच कुटुंब आणि इतर पाच जण इथे राहतात. यापैकी सांगडे कुटुंब आहे. सांगडे कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, कामानिमित्त पाथर्डी येथे राहत होते. धम्मपाल सांगडे, त्याची पत्नी कांचन सांगडे आणि तीन मुलांसह येथे राहत होता. बुधवारी रात्री धम्मपाल आणि कांचन यांच्यात जोरदार भांडण झाले. इतर कुटुंबीयांनी मध्यस्थी करुन हे भांडण मिटवले. यानंतर सांगडे कुटुंबीय झोपी गेले. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला.
सकाळी नेहमीप्रमाणे पोल्टीफार्मवरील दुसरा कामगार विहिरीवर मोटार सुरु करण्यासाठी आला. विहिरीजवळ येताच आतील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विहिरीत धम्मपालच्या दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्याने तात्काळ याची माहिती मालक दिपक गोळम याला दिली. गोळमने पाथर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता आणखी तीन मृतदेह आढळले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे, राजेंद्र सुद्रुक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी तपास सुरु केला. पोलिसांनी धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. चौघांची हत्या झाली की आत्महत्या केली? याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.