गेल्या आठवड्यामध्ये दादर स्टेशनवर एका बॅगेत दोघेजण मृतदेह घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं होतं. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक 11वर तुतारी एक्सप्रेसमधून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांना त्यांना अटक केली होती. या हत्येमधील मृत तरूण अर्शद अली सादीक शेख आणि आरोपी जय चावडा, शिवजित सिंह आणि मृत अर्शदची पत्नी रुक्साना हे सर्वजण मुकबधीर आहेत. या हत्येचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत. अर्शद याच्या हत्येचं बेल्जियम कनेक्शन समोर आलं आहे. या हत्येमधील सर्वजणस दिव्यांग असल्याने हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली? याचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांना असणार आहे.
अर्शद याची त्याचाच मित्र जय चोपडा याने शिवजित सिंहच्या मदतीने हत्या केली होती. अर्शदला दारू पाजून बेशुद्ध केलं. त्यानतंर त्याच्या डोक्यात हातोड्याने जबर घाव केले. इतकंच नाहीतर आरोपींची क्रूरता म्हणजे त्यांनी अर्शद याचे कपडे काढून त्याला नग्न केलं होतं. त्याला मारत असतानाचा व्हिडीओ काढण्यात आला आणि त्यावेळी एक व्हिडीओ कॉल करण्यात आला होता. हा व्हिडीओ कॉल बेल्जियममध्ये राहणाऱ्या जगपालप्रीत सिंगकडून आला होता.
सर्व आरोपी एका व्हाट्सअपवर ग्रुपवर होते. जगपालप्रीत सिंग हासुद्धा मुकबधीर असल्याने तपासात आता मोठा ट्विस्ट आला आहे. मूळचा पंजाबचा असणार जगपालप्रीत फगवाडा येथील रहिवासी असून तो सध्या बेल्जियममध्ये राहत आहे. जगपालप्रीत हत्येच्या वेळी आरोपींनी सूचना देत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी शुक्रवारी माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात या हत्या प्रकरणाची माहिती दिली. जगपालप्रीत सिंगच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LoC) आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जय चावडा, शिवजीत सिंग आणि पीडितेची पत्नी रुक्साना अर्शद अली शेख यांचा समावेश आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.