नवी दिल्ली | 29 जानेवारी 2024 : एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड सदृश पदार्थ फेकल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी एका 16 वर्षीय मुलाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी दुपारी ही मुलगी तिच्या 10 वर्षीय चुलत भावाला परिसरातील शास्त्री पार्क एक्स्टेंशन येथील शाळेतून घेण्यासाठी गेली असताना हा हल्ला झाला. त्या मुलाने काही ओळख-पाळख नसताना एक रँडम मुलगी म्हणून तिला सावज म्हणून निवडलं आणि तिच्यावर हल्ला केला. चौकशीदरम्यान मुलाने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपीने त्या मुलीवर हल्ला केला.
मला मुली आवडत नाहीत, असे सांगत त्याने या नापसंतीतूनच त्या मुलीवर हल्ला केला असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याने ज्या मुलीवर हल्ला केला तिला तो आधी पासून ओळखत नव्हता, ना कधी भेटला होता. मैत्रिणीशी झालेला वाद आणि एकंदरच मुली न आवडण्याची मानसिकता, या रागातूनच त्याने हा हल्ला करत त्या अल्पवयीन मुलीवर
ॲसिड सदृश पदार्थ फेकला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ (बी) आणि ३४१ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मी त्या मुलाला ओळखत नाही, पीडितेचा जबाब
त्या पीडित मुलीवर जो ॲसिड सदृश पदार्थ फेकण्यात आला, त्याचे थेंब तिचे डोळे, मान आणि नाकावर पडले. यामुळे तिची त्वचा थोडी भाजली गेली. तिला जळजळ आणि खाज सुटण्याचा त्रासही जाणवत होता. त्या मुलीवर बुराडी येथील एक सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. हल्लेखोर कोण हे पीडितेलाही माहीत नव्हते. पीडितेच्या जबाबानुसार, की कधीच आरोपीला भेटली नाही किंवा त्याच्याशी बोललीदेखील नव्हती.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
पोलीस उपायुक्त मनोज कुमार मीना यांच्या सांगण्यानुसार, आरोपीने ज्या ठिकाणी गुन्हा केला त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. मात्र, जिथे ही घटना घडली तेथून काही अंतरावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलगा पळून गेल्याचे रेकॉर्डिंग झाले. यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला पकडले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात हा तरुण मुलींचा तिरस्कार करत असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या मुलींना तो आपला बळी बनवायचा. तो पीडितेला ओळखतही नव्हता.