नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) ककरौला भागात विद्यार्थ्यांच्या दोन गटात गँग वॉर (Gang War) झाला. यामध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एका गटातील हल्लेखोर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर गोळी (Firing) झाडली होती. गोळी चेहऱ्यावर लागून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी केली जात आहे. गँगवॉरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची धरपकड करण्यात येत आहे.
मयत विद्यार्थी दिल्लीच्या द्वारका परिसरातील जेजे कॉलनीमध्ये राहत होता. त्याच्या कुटुंबात वडील आणि चार भावंडं आहेत. त्याचे वडील शूज फॅक्टरीमध्ये काम करतात.
शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ककरौलामधील सरकारी शाळेबाहेर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या दोन गटात गेल्या काही काळापासून वाद सुरु होता. मयत विद्यार्थ्याच्या शेजारी राहणारा एक मुलगा याच शाळेत शिकत होता. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्यासाठी तो शाळेबाहेर आला होता.
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांकडे शस्त्रं नेमकी कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. एखाद्या गुन्हेगारी टोळीशी त्यांचा संबंध तर नाही ना, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
संबंधित बातम्या :
पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले
मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फायरिंग
धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणाऱ्यांना बेड्या, नांदेड गोळीबार प्रकरणी चौघांना अटक