नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीत चोरीची मोठी (theft news) घटना घडली आहे. दिल्लीतील भोगल भागात असलेल्या उमराव ज्वेलर्समध्ये रात्री उशिराच्या सुमारास चोरी झाली असून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांवर (jwellery) डल्ला मारला आहे. अतिशय शातीर आणि धूर्त अशा या बदमाशांनी भिंतीला छिद्र पाडून शोरूममधील स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. शोरूममध्ये २५ कोटी रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ही चोरी झाली असावी असा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.
निजामुद्दीन पोलिस स्टेशनचे अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शोरूममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येणार आहे. शोरूमच्या मालकांच्या सांगण्यानुसार, सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचा डल्ला मारण्यात आला. रविवारी रात्री ते दुकान बंद करायला गेले तेव्हा काहीच संशयास्पद दिसत नव्हते. सोमवारी शोरूम बंद असते. हीच संधी साधून चोरट्यांनी लूट केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडायला गेले. शोरूमचे शटर उघडल्यानंतर समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. स्ट्राँग रुमजवळील शोरूमच्या भिंतीला मोठे छिद्र पडलेले होते.
शोरूमचे छत आणि भिंत भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही चोरी त्यांनी अतिशय शांतपणे आणि भरपूर वेळ घेऊन केल्याचे दिसत आहे. कारण त्यानी शोरूममधील सोन्या-चांदीच्या बहुतांश मौल्यवान वस्तू पळवून नेल्या आहेत. या दरोड्यामुळे नक्की किती नुकसान झाले आहे हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्याचा हिशोब अद्याप बाकी आहे, तरीही चोरट्यांनी 20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले असावेत, असा अंदाज व्यथित झालेल्या दुकानमालकांनी व्यक्त केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या शोरूममध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात व्यस्त आहेत. तसेच शोरूमच्या आसपासच्या परिसरातील दुकानांमधील लोक तसेच शोरूममध्ये तैनात असलेले कर्मचारी यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. लवकरात लवकर आरोपींबद्दल काही ना काही सुगावा मिळेलच, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.