नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारांना काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांवर तीन महिन्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कारागृहात घडणाऱ्या गंभीर घटना आणि कारागृहातील कैद्यांच्या मृत्यूचीही दखल घेतली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांकडून स्वत:ला नुकसान करुन घेण्याची वृत्ती आणि आत्महत्या करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी एक सूचना जारी केली आहे.
आयोगाने तुरुंगामध्ये कैद्यांचा स्वत:ला नुकसान पोहवण्याच्या घटना आणि आत्महत्या थांबवण्यासाठी कैद्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष देण्यात सांगितले आहे. तुरुंगातील टॉयलेटमधील लोखंडी रॉड, ग्रिल, पंखे, हुक आणि कैद्यांना स्वत:ला नुकसान पोहचवता येईल अशा वस्तू काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे.
आयोगाने या अॅडवाझरीमध्ये अनेक सूचना केल्या आहेत. कैद्यांना त्यांच्या घरच्यांची भेट घेवू देणे आणि टेलीफोनद्वारे घरच्यांशी बोलू देणे, अशा सूचना आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या निर्णयामागे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या घटना आहेत, ज्यात अनेक तुरुंगात कैद्यांनी स्वत:ला नुकसान पोहचवले आहे.
दरम्यान, तिहाड जेलमध्ये मागच्या काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे जेल प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झालीये. यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे.
कुख्यात गुंड सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरिया दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये कैद होता. 2 मे रोजी गोगी गॅंगच्या योगेश आणि त्याचे साथीदार सकाळी 6 वाजता आपल्या वार्डची ग्रिल कापत बाहेर आले. यानंतर बेडशीटच्या साहय्याने खाली उतरत टिल्लू ताजपुरियाच्या हाय सिक्योरिटी वार्डची ग्रिल कापून त्याची हत्या करण्यात आली.
टिल्लू ताजपुरियाच्या हत्तेआधी लॉरेंस बिश्नोईचा खास असलेला प्रिंस तेवतिया याची हत्या तिहाड जेल मध्ये करण्यात आली होती. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांना तिहाड जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल असल्याचे समजताच धाड टाकण्यात आली होती. तेव्हाही अनेक कैद्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी आणि मोबाईल फोनवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी स्वतःला इजा पोहचून घेतली होती. या छापेमारीत मोबाईल फोन सोबतच अन्य घातक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. छापेमारीत जखमी झालेल्या कैद्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आता मानवाधिकार आयोगाने पुढाकार घेतला आहे. आयोगाने सरकारला वेगवेगळ्या सूचना दिल्या असून त्यामध्ये तुरुंगातील पंखे, हुक, ग्रिल, लोखंडी रॉड काढून टाकण्यात यावेत असं म्हटलं आहे.