नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : दिल्लीमधील जंगपुरा येथील उमराव सिंह ज्वेलरी हाऊसमध्ये २५ कोटींचे दागिने लुटणाऱ्या ( gold roobbery) आरोपीला पोलिसांनी अटक केली. सराईत गुन्हेगार लोकेश श्रीनिवास उर्फ गोलू याला पोलिसांनी आज (गुरूवारी) कोर्टासमोर हजर करण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोरी करून छत्तीसगडला गेल्यानंतर त्याने त्याचा मित्र शिवा, याच्यासमोर सर्वात मोठ्या चोरीबद्दल कबुली दिली होती. मी आता श्रीमंत झालोय, यापुढे कधीच चोरी करणार नाही, अशी शपथही त्याने शिवासमोर घेतली.
याच लुटीच्या आनंदात त्याने त्याने आनंदाने शिवाला सोन्याच्या दोन चेनही (Gold Chain) दिल्या. छत्तीसगड पोलिसांनी शिवाला अटक केल्यावर त्याच्या ताब्यातून दोन्ही साखळ्या जप्त केल्या.दिल्ली पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी आरोपी लोकेशला दिल्लीत आणले. दिल्ली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केलेले दागिनेही आणले आहेत.
दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी आरोपी लोकेश रात्री 11.45 च्या सुमारास छतावरून शोरूममध्ये घुसला आणि नंतर शोरूममध्येच झोपला. रात्री स्ट्राँग रूम कापली तर आवाज येईल आणि आसपासच्या लोकांना कळेल. म्हणूनच त्याने रात्री निवांत झोप काढली, त्यानंतर सकाळी तो लुटीच्या कामाला लागला.
अशी केली चोरी
रविवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी लोकेश हा शोरूमची रेकी करायला गेला. अनेक तास तो तिथेच होता. नंतर तिथून तो गायब झाला. लुटीपूर्वी रात्री तो शोरूमच्या बाहेर कोणाशी तरी बोलत होता, त्यानंतरच तो आत घुसला. आत गेल्यावर त्याने सर्वात पहिले तेथील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर त्याने स्ट्राँग रूम तोडून आत प्रवेश केला. रात्री साधारण 11.45 च्या सुमारास तो आत घुसला, त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी, 7.30 च्या सुमारास तो शोरूमच्या बाहेर पडला. त्या संपूर्ण घटनेदरम्यान त्यानेच काहीच खाल्लं नाही. शोरूममध्ये असलेल्या फ्रीजमधले कोल्डड्रिंक पिऊन त्याने सगळा दिवस काढला.
सकाळी 11 वाजता दागिने गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी स्ट्राँग रूमची भिंत कापली होती. शोरूममधला लुटीचा सगळा माल भरून झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तो बाहेर पडला आणि फरार झाला. तेथून ऑटोने काश्मिरी गेटला पोहोचला. नंतर रात्री 9.15 वाजता तो काश्मिरी गेटच्या बस स्थानकावर होता. तेथून त्याने छत्तीसगड साठी व्हॉल्व्हो पकडली.
जी ऑटो त्याने वापरली पोलिसांना त्या ऑटो रिक्षाचा नंबरही मिळाला. ऑटो चालकाने आरोपी लोकेशचा चेहरा ओळखून , त्याची ओळख पटवली. तसेच बसस्थानकावरही त्याचे सीसीटीव्ही फुटेजही सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तेथून पोलिसांच्या कडक सुरक्षेत त्याला विमानाने दिल्लीत आणण्यात आले.