नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : थेट छतावरून आलेल्या चोरट्यांनी आधी शोरूमची भिंत फोडली आणि मग आत घुसून कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरून (robbery at showroom) पोबारा केला. एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभेल अशी ही घटना प्रत्यक्षात घडली आणि राजधानी दिल्ली हादरली. मात्र कानून के हात लंबे होते है ना…. ही उक्ती खरी ठरवत पोलिसांनी कसून शोध घेत या 25 कोटींच्या लुटीप्रकरणी तीन आरोपींना छत्तीसगडमधून ( 3 arrested) अटक केली आहे. त्यांच्यापैकी एक सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचा बराचसा मालही जप्त केला.
खरंतर , दिल्लीतील जंगपुरा भागात रविवारी रात्री एका नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममधून 25 कोटी रुपयांची चोरी झाली. उमराव सिंग आणि महावीर प्रसाद जैन यांचे हे शोरूम आहे. चोरट्यांनी दुकानातील सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे, सोनं आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. शोरूमचे छत कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता.
डोळे विस्फारतील एवढं सोनं लुटलं
छत्तीसगड पोलिसांनी दुर्ग येथून 7 चोऱ्या करणाऱ्या लोकेश श्रीवास या आरोपीला स्मृतीनगर पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली. त्यानेच दिल्लीतही मोठी लूट केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून दिल्लीच्या शोरूममधून लुटलेलं तब्बल 18 किलो सोन आणि 12.50 लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. तर लोकेशचा दुसरा सहकारी शिवा चंद्रवंशी याला कावर्धा येथून दागिन्यांसह २८ लाख रुपयांच्या मालासह पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना अटक करून दिल्लीत आणण्यात येणार आहे.
लोकेशवर अनेक राज्यांत गुन्हे दाखल
लोकेश हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तेलंगाना, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड या राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने दहा दिवसांपूर्वीच दुर्ग येथील स्मृतीनगर पोलिस चौकीजवळ भाड्याने खोली घेतली होती. कवर्धा येथून पाठलाग करून बिलासपूर पोलिसांनी त्याला भिलाई येथे पकडले. 2019 मध्ये 5 कोटींच्या चोरीच्या प्रकरणातही त्याचे नाव आले होते. छतावरून दुकानात घुसण्याचे चोरीचे तेच तंत्र त्याने दिल्लीतही अवलंबले. तो मूळचा कावर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
रविवारी झालेल्या चोरीने शहर हादरलं
रविवारी रात्री जंगपुरा मार्केट भागात असलेल्या शोरूमच्या छतावरून आत घुसून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी प्रवेश केला. सोमवारी शोरूम बंद असते. हीच संधी साधून चोरट्यांनी लूट केली . त्यांनी पुरेसा वेळ घेऊन शोरूममधील जास्तीत जास्त दागिने लुटले. सोनं, चांदी, हिऱ्यांचे दागिने, काहीकाही त्यांनी सोडलं नाही. एकूण २५ कोटी रुपयांचे दागिने लुटून ते फरार झाले. मंगळवारी सकाळी दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडायला गेले. शोरूमचे शटर उघडल्यानंतर समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले.