नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीतील एका ज्वेलर्सच्या शोरूमवर पडलेल्या दरोड्यानंतर २५ कोटींचे (25 crore robbery in jewellery showroom) दागिने लुटले गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक लुटीची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील एका लुटारूला अटकही केली आहे. नुकतंच त्याने एका कॅब ड्रायव्हरला लुटलं. त्या ड्रायव्हरने पोलिसांत धाव घेऊन याची तक्रारही नोंदवली. पोलिसांनी त्या दरोडेखोरांचा (robber arrested) शोध घेत मुसक्या तर आवळल्या, पण त्यानंतर जी माहिती समोर आली ती आणखीनच धक्कादायक होती.
अनेकांना लुटणारा हा दरोडेखोर , लुटीसाठी ज्या बंदूकीचा धाक दाखवायचा, ती खरी नव्हतीच मुळी. एक टॉय गन (toy gun) वापरून तो हे सर्व गुन्हे करायचा. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून लुटलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील जनकपुरी भागातील आहे. शुक्रवारी येथे एक कॅब चालक प्रवाशाची वाट पाहत उभा होता. अचानक दोन लोक आले, त्याच्या कॅबमध्ये बसले आणि त्याच्या डोक्यावर बंदूक टेकवली. बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी कॅब चालकाकडून रोख रक्कम, मौल्यवान वस्तू हजप केल्या. त्यानंतर त्यांनी त्या ड्रायव्हरला खाली उतरून निघून जाण्यास सांगितले आणि ते कॅब घेऊन फरार झाले.
पहाटे 4 – 4.30 च्या सुमारासा हा सर्व प्रकार घडला. तो कॅब ड्रायव्हर कसाबसा त्याचा जीव वाचवून तेथून पळाला आणि त्याने पोलिस स्टेशन गाठत सर्व प्रकार कथन करून तक्रार दाखल केली. माझ्या कॅबमध्ये जीपीएस लावलं आहे, असंही त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानुसार, पोलिसांनी त्याचा माग काढला आणि सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. सुमारे २ दिवस पोलीस त्या कॅबचा शोध घेत होते. अखेर, त्याची कॅब एका ठिकाणी थांबल्याचे त्यांना दिसले.
पोलिसांना आरोपीचे शेवटचे लोकेशन घेवरा मेट्रो स्टेशनजवळ सापडले. पोलीसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी सिकंदर भान (35) याला त्या गाडीसह रंगेहात पकडले. त्यावेळी आरोपी भान गाडीतून जीपीएस काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून लुटीचा बराच मालही जप्त करण्यात आला. आपण खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवत अनेकांना लुटल्याचे त्याने कबूल केले.
तसेच त्याचा दुसरा (फरार) साथीदार प्रवेश याच्याबद्दलही माहिती दिली. आपण स्वत: एक कॅब ड्रायव्हर आहोत, पण महागड्या गोष्टींचा नाद असल्याने, छानछौकीचे जीवन जगायची इच्छा असल्याने दरोडा टाकण्यास, लूट करण्यास सुरूवात केल्याचे त्याने कबूल केले. साधारणत: म्हाताऱ्या लोकांना टार्गेट करून लुटायचो, असेही तो म्हणाला. लुटीचा माल विकण्यासाठी दिल्लीच्या बाहेर जायचो,अशी कबूलीही त्याने दिली. त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.