नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीत कंझावाला केसप्रमाणे आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी रात्री एका टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करण्यात आली. त्याची गाडी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुटारूंनी त्याला धडक दिली आणि रस्त्यावर बरंच अंतर त्याला फरपटत नेलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रात्री उशीरा ११.३०च्या सुमारास IGI एअरपोर्ट जवळ नॅशल हायवे क्रमांक ८ येथे एका इसमाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून एकच खळबळ माजली.
मृत इसम फरीदाबादचा रहिवासी
विजेंद्र (वय 43) असे मृत इसमाचे नाव असून ते मूळच फरीदाबाद येथील रहिवासी असल्याचे समजते. रिपोर्टनुसार, विजेंद्र हे महिपालपूर भागात त्यांची टॅक्सी चालवत होते. त्याचवेळी लुटारूंच्या एका टोळीने त्यांची गाडी लुटण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर खाली उतरवून टॅक्सी ताब्यात घेतल्यानंतर ते लुटारू टॅक्सी घेऊन पळून जायला लागले. मात्र ड्रायव्हरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्याला जोरदार धडक दिली आणि सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ते त्याला रस्त्यावरून तसेच फरपटत घेऊन गेले.
महिपालपूर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मूळ ड्रायव्हर कारला लटकून फरपटत जात असल्याचे त्यात दिसत आहे. या घटनेत डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि फरपटत गेल्याने त्या ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोर-लुटारूंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांचा वेगाने तपास सुरू केला आहे. ही घटना ज्या रस्त्यावर घडली तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी देखील पोलिस करत आहेत. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
कंझावाला केसच्या आठवणी झाल्या ताज्या
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये एक सहा वर्षांचा मुलगा ट्रकच्या खाली सापडून फरपटत गेल्याने मृत्यूमुखी पडला होता.
तर त्यापूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील कंझावाला भागात एका २० वर्षीय तरूणीला एसयूव्हीने धडक देऊ तिला १३ किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याप्रकरणाने राजधानी हादरली होती. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होता. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारं होतं. तिला कारपासून दूर हटवण्यासाठी आरोपींनी बराच वेळ कार इकडे-तिकडे फिरवली होती.