दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उलगडा झाल्यापासून पोलीस कसून तापस करत पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. पोलीस रोज आफताबची चौकशी करत माहिती घेत आहे. आज आफताबने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी काळी पिशवी जप्त केली आहे. या पिशवीद्वारे संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा होऊ शकतो, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी ही पिशवी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली असून, काही कपडेही जप्त केले आहेत. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होईल, असा पोलिसांना विश्वास आहे.
आफताब सुरुवातीला पोलीस तपासात सहकार्य करत नव्हता. वारंवार आपला जबाब बदलत पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवायला सुरवात करताच आफताब माहिती देत आहे.
आफताब दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या घरातून प्लॅस्टिक पिशवी आणि आरोपीचे काही कपडे जप्त केले आहेत. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून शस्त्रासारखी वस्तूही जप्त करण्यात आली आहे. याचा वापर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
मृतदेहाचे तुकडे करताना रक्त घरात आणि आरोपीच्या कपड्यांवर उडाले होते. आरोपीने नेटवर पाहून घरात पडलेले रक्ताचे डाग अॅसिडने साफ केले. त्यानंतर स्वतःचे कपडेही अनेकदा धुतले.
मात्र कपडे कितीही धुतले तरी त्यावर रक्ताचे नमुने मिळतील, अशी शक्यता फॉरेन्सिक टीमने व्यक्त केली आहे. यामुळे पोलिसांनी आरोपीच्या घरातून त्याचे सर्व कपडे आणि साहित्य जप्त केले असून, फॉरन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत.