पालघर : वर्धा जिल्ह्यातीलआर्वी अवैध गर्भपात प्रकरण (Wardha Abortion Case) ताजे असतानाच आता वसई विरार येथे आणखी आणखी एका महिला डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. येथे काही दिवसांपूर्वी बोगस डॉक्टर सुनील वाडकर यांचा भंडाफोड करण्यात आला होता. आता या बोगस डॉक्टरची पत्नी डॉ. आरती वाडकर यांचेही प्रताप बाहेर निघत आहेत. आरती ह्या दंतचिकित्सक (Dentist) डॉक्टर असताना त्यांनी चक्क ठाणे जिल्हा रुग्णालयातून गर्भपात केंद्राच्या मान्यतेचे प्रमाणपत्र मिळवले आहे. तसेच या प्रमाणपत्राच्या आधारे त्या विरार हद्दीतील हायवे हॉस्पिटलमध्ये गर्भपात केंद्र चालवित असल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस (Police) तपासात उघड झाले आहे.
वसई विरारमध्ये एक महिला दंतचिकित्सक डॉक्टर चक्क गर्भपात केंद्र चालवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे गर्भपात केंद्र त्यांच्याच नावाने असून या महिला डॉक्टरचे नाव आरती वाडकर असे आहे. त्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयातून गर्भपात केंद्राची मान्यता मिळवलेली आहे, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र हे प्रमाणपत्र ठाणे जिल्हा रुग्णालयातूनच घेतले आहे की वाडकर दाम्पत्याने ते तयार केले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र गर्भपात केंद्र सुरु करायचे असेल तर त्याला शासकीय मान्यता आवश्यक आहे. तसेच अवैधरित्या असे केंद्र चालवल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. डॉ. वाडकर यांनी अवैधरित्या गर्भपात केंद्राचे प्रमाणपत्र मिळवलेले असेल तर त्यावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, याआधी डॉ. आरती वाडकर यांचे पती डॉ. सुनिल वाडकर यांचे प्रताप समोर आलेले आहेत. बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टीस करून रुग्ण व शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुनिल वाडकर यांना यापूर्वी अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडे MBBS चे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि चालवत असलेले हायवे हॉस्पिटलची अधिकृत नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नसल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक पथक आणि वसई तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वाडकर यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. वाडकर यांच्या रुग्णालयात डिसेंबर महिन्यात छापा टाकला असता असता त्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय प्रमाण पत्र, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारे कागदपत्र मिळाले नव्हते. तसेच वाडकर यांनी समाधानकारक उत्तरं दिली नव्हती. त्यानंतर वसई तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात भादवी कलम 419, 420 सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीस अधिनियम 1961 चे कलम 33, 37 प्रमाणे वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर बातम्या :
आर्वी गर्भपात प्रकरणात अखेर पीसीपीएनडीटी कमिटीला जाग, तब्बल 260 तासांनी तक्रार, नियमांचा विसर?