जुन्नर-पुणे / सुनील थिगळे : उत्तर पुणे जिल्ह्यात दुचाकीवरून येऊन महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे चोर डोक्यात हेलमेट घालून दुचाकीचा वापर करून दागिने खेचून पसार होतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा चोरांना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. अशीच घटना जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली आहे. धूम स्टाईलने महिलेच्या अंगावरील दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. भरदिवसा रस्त्यावरुन चाललेल्या महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
महिला रस्ता ओलांडत असताना चोरट्यांनी या महिलेवर पाळत ठेवली. यादरम्यान हे तरुण दुचाकीवर हेल्मेट घालून आले. महिला रस्ता ओलांडत असताना हे तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी धूम स्टाईल चोरी केली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेत पलायन केले. या महिलेला काही समजण्याच्या आतच या चोरट्यांनी दुचाकीवरून धूम स्टाईलने पलायन केले. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
घरात एकटे असल्याची संधी साधत जेष्ठ नागरिकाच्या घरात घुसून जेष्ठ नागरिकाला मारहाण करत लुटल्याची घटना नागपुरातील हायप्रोफाईल परिसरात घडली. वयोवृध्दाला हातपाय बांधून जखमी करत 32 लाख रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुरेश पोटदुखे असं जखमी वृद्धाचे नाव असून, त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत.