Dhule Crime : प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या एका प्रियकराला प्रेयसीया कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यात ही घटना घडली. या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मारहाण करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाला तात्काळ अटक करत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे. अजय भवरे (20) असे या तरुणाचे नाव आहे. अजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र याची कुणकुण त्या तरुणीच्या कुटुंबाला लागली. त्यानंतर संतापलेल्या तिच्या कुटुंबियांनी घरी येत अजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला त्या तरुणीच्या कुटुंबियांनी बेदम चोप दिला. या मारहाणीत अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मृत्यूपूर्वी त्याने पोलीस जबाबात घडलेली सर्व घटना सांगितली. माझे आणि त्या मुलीचे प्रेम संबंध होते. त्या मुलीनेच मला भेटण्यासाठी बोलवले आणि यानंतर हा सर्व प्रकार घडला, असा जबाब अजयने दिला होता. यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात अजयचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिय्या मांडला. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी मृत तरूणाच्या कुटुंबियांनी केली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.