मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मागील काही महिन्यांत सोने तसेच हिरे तस्करीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात धडाका लावला आहे. हिरे व्यापारामध्ये कोरोना महामारीनंतर फसवणुकीचे प्रमाण वाढले असून या विरोधात डीआरआयने कारवाईची विशेष मोहीम उभारली आहे. अशाच मोहिमेत एका डायमंड कंपनीच्या संचालकाला डीआरआयच्या पथकाने अटक केली आहे. 39 वर्षीय संचालकाने सीमाशुल्क कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून डायमंडच्या कच्च्या मालाची आयात करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सागर बिपिनचंद्र शाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपी संचालकाचे नाव आहे. शाहने रफ हिऱ्याची किंमत 19.70 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात त्या हिऱ्यांची किंमत सुमारे 13.29 कोटी रुपये असल्याचे डीआरआयच्या तपासणी दरम्यान आढळले. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या डीआरआयच्या कारवाईने हिरे आयातीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या घोटाळेखोरांचे धाबे दणाणले आहेत.
आरोपी सागर शाह हा संचालक असलेली कंपनी किंवा या कंपनीच्या संचालकांनी कच्चा हिऱ्यांच्या आयातीसंदर्भात कोणतीही खरेदी ऑर्डर तयार केली नाही. तसेच परदेशी हिरे पुरवठादारांसोबत केलेल्या व्यवहारांचा कुठलाही पुरावा नसल्याचे डीआरआयच्या पथकाला आढळून आले. सागर शाहने रफ हिऱ्याची किंमत 19.70 कोटी रुपये घोषित केली होती. मात्र सत्यता पडताळण्यासाठी जेव्हा सरकारने व्हॅल्यूअरची नियुक्ती केली, तेव्हा खरी किंमत सुमारे 13.29 कोटी रुपये असल्याचे आढळून आले.
व्हॅल्यूअरच्या नियुक्तीमुळे सागर शाहने केलेल्या फसवणुकीचे बिंग फुटले. आरोपी संचालक शाह याने सीमाशुल्क कायद्यातील विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती डीआरआयच्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शाहने सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून बिल ऑफ एंट्रीअंतर्गत समाविष्ट केलेल्या चुकीच्या घोषित मालाच्या संदर्भात घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती. मात्र चौकशीदरम्यान त्याने हे हिरे आयात केले नसून, त्याच्या कंपनीचे आयईसी वापरले गेल्याचा दावा केला आहे. बेकायदा ऑपरेटर्सनी आर्थिक मोबदल्यासाठी आयईसी वापरला आहे, असे शाहचे वकील आनंद सचवानी यांनी सांगितले.