डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पूर्वेतील मानपाडा (Manpada) रोडला असलेल्या सांगाव-सोनारपाडा (sonarpada) परिसरात सेल्फी काढल्याच्या रागातून मारहाण केल्याची उघडकीस आली आहे. झालेल्या मारहाणीत 40 वर्षीय महिला व तिची मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दोन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर खरं प्रकरण उजेडात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
डोंबिवली मधील श्री. क्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिला आपल्या मुलीसह महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर महिलेच्या मुलीने तिच्या मोबाईलमधून मंदिर परिसरात सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये आरोपी महिलेची छबी आली. त्यामुळे संताप झालेल्या आरोपी महिलांनी तक्रारदार आणि तिच्या मुलीला आमचा सेल्फी का काढला ? असे विचारुन मारहाण सुरू केली.
त्या महिलेचा राग इतक्यात थांबला नाही, तर यातील एकीने रस्त्यावरील दगड उचलून तक्रारदार महिलेच्या डोक्यात हाणला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. किरकोळ कारणावरुन भांडण उकरुन काढून मारहाण केल्याच्या आरोपाखाली जखमी झालेल्या महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन महिलांच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी मंदीर परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली असून लवकरचं त्या महिलांना अटक करण्यात येईल असं सांगितलं आहे.