डोंबिवली / 1 ऑगस्ट 2023 : बिटकॉईनमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत 11 जणांना गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने एका महिलेसह अन्य 10 जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीची आणि महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेला गंडा घातला. मानपाडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आरोपीचाही शोध घेत आहेत. अशा प्रकारे अधिक नफ्याचे आमिष दाखवत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर पोलिसांनी काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आरोपीचे इन्स्टाग्रामवर ऑलीव्हा 43 या नावाने अकाऊंट आहे. या अकाऊंटवरुन त्याने डोंबिवलीत राहणाऱ्या नूतन यांच्याशी ओळख केली. मग महिलेला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करुन आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. कमी कालावधीत ज्यादा नफा मिळत असल्याने महिलाही या आमिषाला बळी पडली. महिलेने तात्काळ आरोपीकडे 6 लाख 54 हजार रुपये गुंतवले. अशा प्रकारे आरोपीने आणखी 10 जणांना गंडवले आहे.
दोन महिने उलटले तरी ना परतावा मिळाला ना गुंतवलेली रक्कम परत मिळाली. महिला सतत आरोपीकडे पैशासाठी तगादा लावत होती. मात्र आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने मानपाडा पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत.