आधी कट मारुन कार थांबवली, मग गाडीतील प्रवाशांना लुटून पसार झाले !

| Updated on: Apr 05, 2023 | 3:01 PM

कल्याण-डोंबिवलीत तडीपार गुन्हेगारांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. प्रवेश निषिद्ध असतानाही शहरात येऊन लुटमारीच्या घटना करत असल्याचे उघडकीस आले आहे.

आधी कट मारुन कार थांबवली, मग गाडीतील प्रवाशांना लुटून पसार झाले !
प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली / सुनील जाधव : चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी रिक्षाने एका कारला कट मारुन गाडी थांबवली. मग कारमधील तीन प्रवाशांना लुटून पसार झाले होते. याप्रकरणी प्रवाशांनी मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. प्रवाशांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला. यानंतर आरोपींचा कसून शोध घेत अवघ्या दोन तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींची चौकशी केली असता अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला. आरोपींकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कार थांबवून प्रवाशांना लुटायचे

चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा ऋषिपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेश कुमार कनोजिया अशी तिघा आरोपींची नावे आहेत. यात एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हे आरोपी दरोड्यासाठी रिक्षाचा वापर करत असत. रिक्षाने कारला आधी कट मारायचे, मग कार थांबवून कार चालक आणि प्रवाशांना मारहाण करत लुटून फरार व्हायचे.

मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे गोवंडीत राहणाऱ्या एका ओला कारला कट मारत कार थांबवली. त्यानंतर ओला चालक आणि तीन प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण करून त्यांची पर्स, मोबाईल आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

झोन 3 चे अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहा.पोलीस सुनिल कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करून तांत्रिक तपास आणि गुप्तबातमीदाराच्या मदतीने या पाच आरोपींना दोन तासात बेड्या ठोकल्या.

आरोपींकडून मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून 9 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दरोडेखोरांवर कल्याण डोंबिवली आणि इतर परिसरात हत्या, दरोडा, दरोड्याची प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात मुख्य आरोपी चंद्रांकांत जमादार हा तडीपार आहे.