डोंबिवली : इंस्टाग्रामवर ओळख वाढवत भेटण्यास बोलवून राईडच्या बहाण्याने महागडी बाईक चोरून पसार झालेल्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत वटकर असे या चोरट्याचे नाव असून, हा आरोपी सराईत बाईक चोर आहे. आरोपीविरोधात डोंबिवली, मानपाडा, ठाण्यातील कोपरी, कापूरबावडी पोलीस ठाण्यात बाईक चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. याआधी अनिकेत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाड्या चोरी करायचा. आता त्याने सोशल मीडियाच्या आधारे दुचाकी चोरीची ही नवीन शक्कल लढवली. पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
डोंबिवली पश्चिममध्ये राहणाऱ्या एका तरुणाची इंस्टाग्राममध्ये ओळख वाढवून 1 नोव्हेंबर रोजी ठाकुर्ली स्टेशन बाहेर भेटावयास बोलवले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी कशी चालते हे पाहण्यासाठी घेऊन गेला आणि परतलाच नाही.
बराच कालावधी उलटून चोरटा परत न आल्याने या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ही तपास सुरू करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज काढून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला.
सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीची ओळख पटवली. सदर आरोपी हा कल्याण पश्चिम भागात फिरत असल्याची माहिती मिळत असताना त्यांच्या पथकाने सापळा रचत या आरोपीला ताब्यात घेतले.
तपासा दरम्यान अनिकेत सराईत चोरटा असल्याचे समोर आले. अनिकेत विरोधात डोंबिवली, मानपाडा कोपरी, कापूरबावडी या पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली. तसेच त्याने आणखी काही दुचाकी देखील चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
अनिकेत हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी चोरी करायचा. यंदा मात्र त्याने ही नवीन शक्कल लढवली होती. अनिकेत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.