डोंबिवली : डोंबिवलीत जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट आहे. भेसळयुक्त दूधानंतर आता भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचे डोंबिवलीत उघडकीस आले आहे. जनसामान्यांच्या रोजच्या वापरातील आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून खाद्यतेलाकडे बघितले जाते. याच तेलात आता खालच्या दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती. रामनगर पोलिसांनी या खाद्यतेलाच्या गोडाऊनवर छापा टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 5 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. याच पाठोपाठ आता खालच्या दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावून संपूर्ण महाराष्ट्रत विक्री होत होती. तसेच याच खाद्यतेलाची विक्री मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत होत होती. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी डोंबिवली पूर्व येथील एका तेलाच्या व्यापाऱ्याला ताब्यात घेतले होते. यावेळी या व्यापाऱ्याने मुंबईतील एका डीलरकडून तेल घेतल्याची माहिती रामनगर पोलिसांना दिली होती.
यानंतर हे भेसळयुक्त तेल नेमकं कुठे बनतं यासाठी रामनगर पोलिसांनी विविध टीम बनवत शोध सुरू केला होता. याच प्रकरणात रामनगर पोलिसांना मुंबईच्या मस्जिद बंदर येथे एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त तेलाला नामांकित कंपनीचे लेबल लावत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हवालदार विशाल वाघ, निलेश पाटील जयपाल मोरे, नितीन सांगळे यांनी मस्जिद बंदर येथील गोडाऊनवर छापा मारला.
छापेमारीत 5 लाख 45 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. दीपक जैन, तारिक मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. या आरोपींनी अजून किती ठिकाणी अशा प्रकारे गोडाऊन उघडले आहेत, याचा तपास रामनगर पोलीस करत आहेत.