Dombivli Crime : कोणाला उपचार, कुणाला नोकरीचं आश्वासन… नको त्या ‘धंद्या’ला लावलं; देह व्यापाराचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त

| Updated on: Oct 09, 2023 | 3:41 PM

शहरात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेल आणि मानपाडा पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. नकली दस्तवेज तयार करून नको ते काम करायला लावणाऱ्या पाच जणांना अटक केली. तर या रॅकेटच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अनेक मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.

Dombivli Crime : कोणाला उपचार, कुणाला नोकरीचं आश्वासन... नको त्या धंद्याला लावलं; देह व्यापाराचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 9 ऑक्टोबर 2023 : डोंबिवलीत गुन्ह्यांच्या (crime news) वाढत्या प्रमाणाने नागरिक अक्षरश: धास्तावले असून जीव मुठीत घेऊन जगत असतात. शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस कसून प्रयत्न करत असतानाच शहरात एक मोठ्ठी धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेल आणि मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत देह व्यापाराचं मोठं रॅकेट (police busted racket) उध्वस्त केलं आहे. कुणाला उपचारांच्या बहाण्याने तर कुणाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन बांग्लादेशमधील मुलींना डोंबिवलीत आणण्यात आलं होतं.

एवढचं नव्हे तर घरमालकाच्या मदतीने नकली दस्तवेज तयार करून त्या मुलींना नको ते काम करण्यास भाग पाडण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हे रॅकेट उधळून लावत त्या दुष्टचक्रात अडकलेल्या अनेक मुलींची सुखरूप सुटका केली. तसेच याप्रकरणी ५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

खोटी आश्वासनं देतं आणलं शहरात

कोणाला उपचारांच्या बहाण्याने आणलं तर कोणाला चांगली नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनाने शहरात आणण्यात आलं होतं. मात्र इथे आल्यावर त्यांना देहविक्रय करण्यास भाग पाडलं. हे दुष्कृत्य करणाऱ्या पाच दलालांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीतील हेदूटने गावातून अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग ( अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेल ) च्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून सात मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. युनूस शेख उर्फ राणा , साहिल शेख, फिरदोस सरदार, आयुब शेख, बीपलॉप खान अशी या आरोपींची नावे आहेत.

तयार केले नकली दस्तवेज

या आरोपीने डोंबिवलीत भाड्याने घर घेतले आणि घर मालकाच्या मदतीने या महिलांचे नकली दस्तवेज तयार केले. त्यानंतर या मुलींना महाराष्ट्रातील अनेक लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये देहविक्रय करण्यासाठी पाठवण्यात येत होते. पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

असे उघड झाले रॅकेट

५ ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेशहून एक ईमेल आला. एका १९ वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने बांग्लादेशमधून भारतात आणले आहे. ती मुलगी डोंबिवलीत असून तिला देहविक्रय करण्यास भाग पाडत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर माहिती त्यांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांनी स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. या रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींची सुटका केली.

तर काही लोकांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. काही आरोपींनी बांग्लादेशातील महिलांना नोकरी व उपचाराचे आमिष दाखवून त्यांना बांग्लादेश मधून भारतात आणल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. या मुलींवर आधी लैंगिक अत्याचार केला नंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं. देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात होती, असेही समोर आले. मानपाडा पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपींना अटक केली.