सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 30 नोव्हेंबर 2023 : कधी सोनसाखळी खेचली, तर कधी दहशत माजवण्यासाठी शहरात कोयता घेऊन फिरला. सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारं डोंबिवली सध्या गुन्ह्यांमुळे जास्त ओळखलं जात आहेच. याच शहरातून आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका आईस्क्रीम चालकावर चौघा जणांनी प्राणघातक हल्ला करत त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून उतरलेल्या चौकडीने त्या इसमावर लाठ्या काठ्या व धारदार शस्त्राने हल्ला केला.
हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा हल्ला का व कुणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.
इससे पुराना हिसाब बाकी है, म्हणत चढवला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात आईस्क्रीम विक्रेता जमनालाल माली हे रात्रीच्या सुमारास आईस्क्रीम विक्री करणाऱ्या काही मित्रांसोबत त्यांच्या आईस्क्रीमच्या हातगाडीची साफसफाई करत होते. मात्र त्याचवेळी तेथे रिक्षामधून चौघे जण उतरले, त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ‘इससे पुराना हिसाब बाकी है’, अस म्हणत रिक्षातून उतरलेल्या चौघांपैकी एकाने लाकडी दांडक्यासह चाकूने जमनालाल यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्याच्या इतर मित्रांवरही त्या टोळक्यातील काहींनी हल्ला चढत लाथा-बुक्क्याांनी चांगलेच बुकलून काढले.
सर्व आईस्क्रीम चालकांनी त्या हल्लेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर सशस्त्र असल्याने त्यांच्यापुढे आईसक्रीमवाल्यांचे चालले नाही. सर्वांना मारहाण करून हल्लेखोरांनी रिक्षातून तातडीने पळ काढला. हा सारा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
याप्रकरणी पीडत जमनालाल यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रा दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान केडीएमसीचा वाहन चालक विनोद लकेश्री याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आईसक्रीमवाल्यांवर देखील अशाच पद्धतीने हल्ला झाला. यामुळे सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या डोंबिवलीत अराजकता माजल्याचे दिसून येते.