Dombivli Crime : कोयत्याचा धाक दाखवत आयफोन चोरण्याचा प्रयत्न, भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ

| Updated on: Nov 29, 2023 | 9:42 AM

वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्त, गस्त वाढवली असली तरीही गुन्हेगारांना आळा बसत नाहीये. त्यातच आता शहरात आणखी एक हादरवणारी घटना घडली. डोंबिवलीमध्ये जिओच्या गॅलरीत एका चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून आयफोन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Dombivli Crime : कोयत्याचा धाक दाखवत आयफोन चोरण्याचा प्रयत्न, भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 29 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीमध्ये चोरी, लूटमार, हाणामारीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका तरूणाने भावाला हातात कोयता घेऊन शहरभर फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ माजली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्त, गस्त वाढवली असली तरीही गुन्हेगारांना आळा बसत नाहीये. त्यातच आता शहरात आणखी एक हादरवणारी घटना घडली आहे.

डोंबिवलीमध्ये जिओच्या गॅलरीत एका चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून आयफोन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

कोयता घेऊन दुकानात घुसला आणि

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील शहीद भगतसिंग रोडवर जिओची गॅलरी आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास या जिओ गॅलरीमध्ये एक अज्ञात इसम घुसला आणि त्याने थेट कोयताच काढला. दुकानातील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्याने त्या दुकानातील महागडा आयफोन चोरून नेण्याचया प्रयत्न केला. सगळचे कर्मचारी अतिशय घाबरले. मात्र त्यातही काही कर्मचाऱ्यांनी थोडेसे धाडस दाखवत आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्या चोरट्याने फोन तेथेच टाकला आणि दुकानातून लागलीच पळ काढला. ही संपूर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे पोलिस त्या चोराचा शोध घेत आहेत. मात्र गजबजलेल्या रस्त्यावर भरदिपारी ही घटना घडल्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये, व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच गुन्हेगारांना वचक बसेल यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे.