सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 11 जानेवारी 2024 : डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याचा राग मनात धरून एका कुटूंब्याला मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांची गाडीही फोडण्याच आली. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. सदानंद सालियन असे मारहाण झालेल्या तक्रारदाराचे नाव असून रोहित पाटील व उजाला पाटील असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
नक्की कशावरून सुरू झाला वाद ?
मिळालेल्या माहिती नुसार डोंबिवली पूर्व येथील चोळेगाव परिसरात एका इमारतीत सदानंद सालियन हे मागील 10 वर्षांपासून राहतात. अलीकडेच त्यांनी इमारतीचे सचिव पद स्वीकारले होते. मागील चार महिन्यांपासून इमारतातीत पाण्याची अडचण जाणवत होती, त्याच मुद्यावरून 6 जानेवारीला इमारतीच्या टेरेसवर एक मीटिंग चालू होती. या मीटिंगमध्ये त्याच इमारतीत एका फ्लॅटचे मालक रोहित पाटील, उजाला पाटील आणि अमृता पाटील हे तिघेही उपस्थित होते. मीटिंगमध्ये चर्चा सुरू असताना, अमृता यांनी मोठ्या आवाजात बोलत हस्तक्षेप केल्याने सदानंद यांनी त्यांना रोखले व तुम्ही सदस्य नसल्याने उगाच गोंधळ घालू नका असे सांगितले.
यावरून उजाला यांना राग आल्याने त्यांनी सदानंद यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. काहीच क्षणात त्याचे मारामारीत रुपांतर झाले. मग रोहित पाटील यांनीही सदानंद सालियन व त्यांच्या कुटूंबाला मारहाण करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर त्याला त्याचा राग न आवरल्याने रोहिच याने चक्क त्याने मोठा बांबू घेतला आणि इमारतीत उभी असलेल्या सदानंद याच्या गाडीचीही तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणात रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करत रोहित पाटील, उजाला पाटील व अमृता पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.