सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 16 ऑक्टोबर 2023 : कल्याण -डोंबिवली परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेची धास्ती वाढली. या शहरांमधील गुन्हेगारीचं (crime in city) वाढतं प्रमाण हे सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण बनलं आहे. पोलिसांनी कारवाई करूनही गुन्हेगारांना आळा बसत नाहीये. त्यातच आता शहरात एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी (threat call) मिळाल्याने शहर हादरलं आहे.
मित्राचे पैसे काढण्यासाठी दोन आरोपींनी एका बांधकाम व्यावसायिकाला बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रामनगर पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या. आकाश रमेश गिरी आणि इंद्रजीत यादव अशी त्यांची नावे असून या आरोपींनी आणखी कोणाकोणाला अशी धमकी दिली आहे आणि त्यांचा या गँगशी काय संबंध आहे, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
मध्यरात्री फोन खणखणला आणि..
डोंबिवलीतील प्रशांत विठ्ठल जाधव हे बांधकाम व्यावसायिक राहतात. 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास त्यांचा फोन खणखणला. जाधव यांनी फोन उचलला आणि समोरच्याचं बोलणं ऐकून ते हादरलेच. कॉलवरील समोरच्या व्यक्तीने आपण बिश्नोई गँगचा माणूस बोलत असल्याचे सांगितले. तू इंद्रजित यादव याचे पैसे दे नाहीतर काही खरं नाही, तुझा मर्डर करेन, अशा शब्दात त्याने जाधव यांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली.
या कॉलमुळे धास्तावलेल्या जाधव यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. बिश्नोई गँगचं नाव समोर आल्याने रामनगर पोलिसांनी तत्काळ तपास केला. अथक तपासानंतर त्यांनी आकाश रमेश गिरी आणि इंद्रजित राजाराम यादव या नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांची चौकशी करण्यात आली असता खरं काय ते समोर आलं.
इंद्रजित हा प्रशांत जाधव यांच्याकडे कामाला होता. त्याचे काही पैसे जाधव यांनी देणे बाकी होते. इंद्रजितने वारंवार मागूनही जाधव यांनी पैसे काही दिले नाहीत त्यामुळे तो खूप वैतागला होता. अखेर त्याने याबद्दल त्याचा मित्र आकाशला सांगितले आणि त्यांनी दोघांनी हा प्लान आखला. आकाश याने विठ्ठल यांना धमकावण्यासाठी कॉल करत स्वतःला बिश्नोई गँगचा शूटर असल्याचे सांगितल. सध्या या प्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे