सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 25 ऑक्टोबर 2023 : डोंबिवलीमध्ये नागरिक सध्या मोठ्या भीतीखाली जगत आहेत, त्याला कारणीभूत आहे शहरातील गुन्ह्यांचं (Dombivli Crime) वाढतं प्रमाण. कधी देवदर्शनाला निघालेल्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न होतो तर कधी पैसे काढण्यासाठी कुख्यात गँगच्या नावाने बिल्डरला धमकी दिली जाते. काहींनी तर ऑनलाइन टॅक्सी बूक करून सुनसान जागी गेल्यावर टॅक्सी चालकालाच लुटले. गुन्ह्याच्या अशा विविध आणि हादरवून टाकणाऱ्या घटना डोंबिवलीत (crime cases in Dombivli) वरचेवर घडत असल्याचे समोर आले आहे.
त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. वर्षानुवर्षे वडिलांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला आपल्या घरी साफसफाईसाठी बोलावणं एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं. कारण जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिनेच घात करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील लाखोंच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी कल्पना सुर्वे नावाच्या महिलेला बेड्या ठोकल्या. तिच्याकडून 96 हजारांचे दागिने जप्त केले आहेत.
ज्या घरचं मीठ खाल्लं त्याच घरात…
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात स्वाती पुष्कर आपटे या शिक्षिका राहतात. 30 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या घरातून सुमारे 52 ग्रॅम वजनाचे, वेगवेगळ्या प्रकारे सोन्याचे, 4 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी आपटे यांनी डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात
तक्रार दाखल केली. तसेच आपल्या वडिलांच्या घरी काम करणाऱ्या महिलेनेच हे दागिने चोरले असावेत असा संशय त्यांनी व्यक्त केला.
त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत तक्रारदार महिलेच्या वडिलांकडे कामासाठी येणारी महिला कल्पना सुर्वे हिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. तेव्हा
तिने आपला गुन्हा कबूल केला. कल्पना ही स्वाती यांच्या वडिलांच्या घरी बरीच वर्ष काम करत होती. विश्वासू असल्याने स्वाती काही वेळा कल्पना हिला त्यांच्या घरीदेखील साफसफाई करण्यासाठी बोलावत असत. याच संधीचा फायदा घेऊन कल्पनाने घरात येऊन, हळूहळू कपाटातील दागिने चोरायला सुरूवात केली. दोन महिन्यांच्या काळात तिने सुमारे ४ लाख रुपयांचे दागिने चोरले.
त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून टिळक नगर पोलीस अधिक तपास करत आहे