सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 6 नोव्हेंबर 2023 : शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाणा वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या मनातील धास्ती वाढली आहे. अशीच एक दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वे स्टेशनजवर जाण्यासाठी रूळ ओलांडणाऱ्या महिलेला असा धक्कादायक अनुभव आला ज्यामुळे ती हादरली.
रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेवर चोरट्याने हल्ला केल्याचे उघड झाले. चोरट्याने तिच्यावर हल्ला त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले आणि मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला आणि तो फरार झाला. कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपी लालबहादूर बाकेलाल यादव याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला.
पाठलाग करत केला हल्ला
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रवासी महिला संध्या नागराळ (वय ५४) ह्या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटूंबासह राहतात. ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्या बदलापूरहून डोंबिवली येथे काही कामासाठी आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या डोंबिवली येथून कोपर येथे रेल्वेने गेल्या. रात्री पावणेनऊच्या सुमारास कोपर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर पूर्वेकडे जाण्यासाठी त्या रेल्वे रुळ ओलांडून पायीच जात होत्या.
त्याचवेळी त्यांच्या पाळतीवर असलेला एक अनोळखी इसम त्यांच्या मागून आला आणि त्याने कात्रीच्या सहाय्याने संध्या यांच्यावर जोरदार वार केला. तसेच त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले आणि हातातील महागडा मोबाईल खेचून घेतला आणि तो तिथून पळू गेला. या घटनेमुळे हादरलेल्या संध्या यांनी जवळील डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि अनोळखी चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व त्यांच्या टीमने अवघ्या काही तासात गुप्त बातमीदारांच्या माहितीनंतर व तांत्रिक तपास करत लालबहादूर बाकेलाल यादव नावाच्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आणि मुद्देमाल जप्त केला. त्याने याप्रकारे आणखीही, असेच गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे.