डोंबिवली| 12 मार्च 2024 : सध्या सर्वत्र परीक्षांचा सीझन सुरू आहे. राज्यभरातील शाळकरी विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स यासह १०वी, १२वीच्या ही बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी वर्षभराच्या अभ्यासाची उजळणी करून शांतपणे अभ्यास करून पेपर द्यायचा प्रत्येक विद्यार्थ्याचा मानस असतो. मात्र आजूबाजूचे गोंधळ, आवाज यामुळे काही वेळा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. असाच त्रास डोंबिवली पूर्वेतील विद्यार्थ्यांना झाला. शेजारच्या घरी वाढदिवसानिमित्त पार्टी सुरू होती आणि मध्यरात्र उलटून गेली तरी स्पीकरवरून लावलेल्या गाण्यांचा आवाज कमी होत नव्हता. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, हाच आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या एका इसमाला मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. कारण त्याने स्पीकरचा आवाज कमी करायला सांगताच शेजारचे भडकले आणि त्यांनी त्या इसमालाच बेदम मारहाण केली.
सुसंस्कृतांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत हा धक्कादायक प्रकार घडला. डोंबिवलीमधील रामनगर पोलीस ठाणे हद्दीतीत शेतार चौक येथे शनिवारी संध्याकाळी एका रहिवाशाच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी त्यांच्या घरी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावण्यात आली होती. पण यामुळे इतर नागरिकांना त्रास होत होता. म्हणूनच एका रहिवाशाने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. सकाळी कामावर जायाचे आहे, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा, असे एका इसमाने सांगितले. पण याच सांगण्याचा राग आल्याने दोन तरूणांनी त्या इसमाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडती.
श्याम दीपक सोनावणे (३५) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. ते या मारहाणीत जखमी झाले. सोनावणे हे डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागातील इंदिरानगर मध्ये राहतात. शनिवारी इंदिरानगर मध्ये रामदास अहिरे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे साडेबारा वाजून गेले तरी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजातील गाणी सुरूच होती. अहिरे यांच्या शेजारी राहणारे, श्याम सोनावणे आणि इतर शेजाऱ्यांनी अहिरे यांना गाण्यांचा, लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. पण अहिरे कुटुंबियांना त्ंयाचा राग आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर असलेल्या दोन तरूणांना श्याम यांचे बोलणे सहन न झाल्याने त्यांनी श्याम यांच्याशी हुज्जत घालून त्यांना बेदम मारहाण केली. ते बरेच जखमी झाले. त्यानंतर सोनावणे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.